करोनाच्या महासाथीचा प्रादुर्भाव जगभरातील अनेक देशांमध्ये दिसून येत आहे. या महामारीमुळे मोठा आर्थिक फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसलाय. भारतामध्येही करोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार उडवला. एवढ्या मोठ्याप्रमाणामध्ये देशात करोनाबाधित आढळून येतील असा विचारही कोणी केला नव्हता. रुग्णालयांमध्ये बेड्सची कमतरता, औषधं, ऑक्सिजनची कमतरता यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागलं. आता कुठे करोनाची दुसरी लाट देशामध्ये सौम्य झाल्याचं चित्र दिसत आहे. दुसरीकडे लसीकरणही मोठ्या संख्येने करण्यात येत आहे. असं असतानाच करोना प्रोटोकॉल म्हणजेच मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम हा उत्तम पर्याय असल्याचं सांगण्यात येत आहे. सरकारकडूनही यासंदर्भातील जनजागृती करणाऱ्या जाहिराती आणि इतर मोहिमा राबवल्या जात आहेत. स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावं याच्या टीप्स सरकार अधिक सोशल नेटवर्किंगवरुन शेअर करत आहे. सोशल डिस्टन्सिंगचं महत्व सुद्धा सोशल नेटवर्किंगवरुन हायलाइट केलं जात आहे.

नक्की वाचा >> २० हजार वर्षांपूर्वीही आलेली करोनाची साथ; संशोधनामधून समोर आली थक्क करणारी माहिती

सध्या सोशल नेटवर्किंगवर सरकारकडून केल्या जाणाऱ्या जनजागृतीसंदर्भातील पोस्टखाली लोकांच्या मजेदार कमेंट्स लगेच लक्ष वेधून घेताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने केलेल्या एका ट्विटवर अशीच एक प्रतिक्रिया आली आहे. या ट्विटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं महत्व सांगताना अनावश्यक पाहुण्यांना घरी बोलवू नका. सुरक्षित राहा. लक्षात ठेवा साफसफाई, स्वच्छा, औषधे यांनीच आपण ही लढाई जिंकू शकतो, असं या पोस्टमध्ये लिहिलेलं. तसेच पुढे #Unite2FightCorona हा करोनाविरुद्धची लढाई एकत्र लढू अशा अर्थाचा हॅशटॅग वापरण्यात आलेला. याच पोस्टवर एका युझरने केलेली कमेंट सध्या चर्चेत आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या या ट्विटवर एका युझरने, “हे ट्विट आताच मी आमच्या शेजारच्या काकूंना दाखवलं ज्या चहा पिण्यासाठी आमच्या घरी आल्यात. मी त्यांना आरोग्य मंत्रालयाचं हे ट्विट दाखवलं तर त्या म्हणाल्या, आम्ही कारण नसताना कोणाला बोलवत नाही आणि कोणाकडे जातही नाही,” असं म्हटलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून या युझरने उपहासात्मकरित्या कारण नसताना लोकांच्या घरी जाणाऱ्यांचे कान टोचलेत. करोनाच्या कालावधीमध्ये शेजाऱ्यांकडेही जाणं टाळलं पाहिजे आणि स्वत: तसेच स्वत:च्या कुटुंबाला सुरक्षित ठेवलं पाहिजे असं सांगितलं जात असतानाही अनेकजण नियम तोडताना दिसत आहे.

करोनाची दुसरी लाट ओसरल्याने लोकांच्या बेजबाबदारपणा वाढल्याचं दिसत आहे. त्यामुळेच आता लोक बिनधास्त फिरु लागलेत. अशा लोकांना सोशल डिस्टन्सिंगचं आणि करोना अजून संपलेला नाही अशी आठवण करुन देणाऱ्या पोस्ट सध्या सोशल नेटवर्किंगवर केल्या जात आहेत.