करोना विषाणूविरोधात जीवाचा धोका पत्करुन लढणारे डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ, पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) टाळ्या आणि थाळ्या वाजवून आभार मानण्याचे आवाहन जनतेला केलं होतं. या आवाहनला जनतेनं चांगला प्रतिसाद दिला आहे. रविवारी संध्याकाळी बरोबर ५ वाजता लोकांनी आपापल्या सोसायट्यांच्या परिसरात, गॅलरीमध्ये येऊन टाळ्या वाजवल्या तसेच बच्चे कंपनीनं थाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. अनेकांनी फेसबुकवरुन लाइव्हही केले. अनेक ठिकाणी तरुणांनी चक्क गो करोना गो च्या घोषणाही दिल्याचे पहायला मिळाले.

देशातील अत्यावश्यक सेवा पुरवाणारा कामगारवर्ग तसेच करोनाग्रस्तांना तंदरुस्त करण्यासाठी झगडणारे डॉक्टर आणि नर्सेस, वैद्यकीय स्टाफ, पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांना मोदींनी काही दिवसांपूर्वी केलेल्या भाषणात सलाम केला. तसेच याच भाषणामध्ये रविवार हा ‘जनता कर्फ्यू’ म्हणून पाळण्याचे आवाहनही मोदींनी केलं. सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत घरातच थांबा मात्र सायंकाळी पाच वाजता पाच मिनिटांसाठी आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये, खिडक्यांमध्ये आणि दरात येऊन टाळ्या, ताटं, वाट्या वाजवून या आत्यावश्यक सेवा पुरवण्याचे आभार मानले.

मोदींनी टाळ्या आणि ताट वाजवण्यास सांगतिलं असलं तरी अनेकांनी उस्फुर्तपणे घोषणाही दिल्या. यामध्ये ‘भारत माता की जय,’ ‘जय हिंद’ यासारख्या घोषणा अनेकांनी आपल्या बाल्कनीमधून दिल्या. अनेक ठिकाणी लोकांनी शंखनादही केला. काही ठिकाणी ‘गो करोना गो’च्याही घोषणा देण्यात आल्या. अनेकांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणाही दिल्या.

गो करोना नक्की आहे तरी काय?

काही दिवसांपू्र्वी मुंबईमध्ये करोनासंदर्भातील जनजागृतीसाठी काही चीनी नागरिक बॅनर घेऊन उभे होते. त्यावेळी आठवले यांनी त्यांची भेट घेतली. हे परदेशी नागरिक मूळचे चीनचे असल्याने त्यांनी भारत चीन संबंध या संकटात अधिक दृढ होतील असा विश्वास व्यक्त केला. चीनचे भारतातील काऊन्सील जनरल तांग गुइलाई हेही यावेळेस उपस्थित होते. आठवले आंदोलनाच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी भारत चीन संबंध सुदृढ राहोत असं म्हटलं आणि ‘गो करोना… गो… गो करोना… गो’ अशा घोषणा देऊ लागले. आठवले यांना घोषणा देताना बघून उपस्थितांनाही हुरूप आला आणि परदेशी नागरिकांनीही ‘गो करोना’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला. अनेकांनी यावरुन आठवलेंना ट्रोल केलं.

ट्रोलर्सला आठवलेंचे उत्तर

‘गो करोना… गो… गो करोना… गो’वरुन ट्रोल करण्यात येत आहे, तुमच्यावर टीका होत आहे यासंदर्भा आठवलेंना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी ट्रोलर्सचा समाचार घेतला होता. “गो कोरोना नाही, तर मग काय कम कोरोना म्हणू का?”, असा सवाल उपस्थित करत आठवलेंनी घोषणाबाजीचं समर्थन केलं आहे. “एवढा गंभीर आजार देशात दाखल झाला असताना कोरोना गो नाही, तर मग काय कोरोना या असं म्हणणार आहे का? कोरोना कम असं मी कधीच म्हणणार नाही. कोरोना गो असंच मी म्हणेल. यावरुन टीका करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. माझ्यावर टीका करणाऱ्या कोणावरही मी टीका करणार नाही. कोरोना गो म्हणजे कोरोनाने येथून जावं अशी माझी भूमिका आहे. कोरोनाने येथे येऊ नये आणि आला असेल तर येथून जावं, अशी प्रतिकात्मक भूमिका मी घेतली आहे,” असं मत आठवलेंनी नोंदवलं होतं.