सध्या देशभरात करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर आणि पोलीस डोळ्यात तेल ओतून २४ तास आपलं कर्तव्य बजावत आहेत. करोनामुळे संपूर्ण देश ठप्प झाला आहे. पण काही लोकं आजही आपलं वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून देशासाठी झटत असताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली. आपलं कर्तव्य बजावत असलेल्या एका डॉक्टरांच्या आईनं जगाचा निरोप घेतला.

१७ मार्च रोजी संबलपुरचे सहाय्यक चिकित्सा अधिकारी डॉ. अशोक दास यांच्या आईचं निधन झालं. अशा कठीण परिस्थितही ते आपल्या कामावर हजर झाले होते. जिल्ह्यातील नोडल अधिकारी म्हणून ते आपलं कर्तव्य बजावत होते. इंडिया टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
यादरम्यान डॉ. अशोक यांनी अनेक बैठकांना हजेरी लावली. लोकांमध्ये जाऊन त्यांना करोनाशी सामना करण्याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील मुख्य सरकारी रूग्णालयातही हजेरी लावली आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. संध्याकाळी जेव्हा ते आपल्या घरी परतले त्यांवेळी त्यांनी आपल्या आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. यावेळी डॉ. अशोक यांनी लोकांच्या जीवनाला आणि आपल्या कामाला अधिक महत्त्व दिलं.

यापूर्वीही ओडिशाचे आयएएस अधिकारी निकुंज धल यांनीदेखील अशा प्रकारेच आपल्या कर्तव्य बजावलं होतं. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर २४ तासात ते आपल्या कामावर रूजू झाले होते. त्याच्या खांद्यावर राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाची जबाबदारी आहे. करोनासारख्या मोठ्या लढाईत अशा अधिकाऱ्यांच्या कामाला एक सलाम तर बनतोच.