जगभरामधील १८० हून अधिक देशामध्ये करोनाचा फैलाव झालेला असतानाच आखाती देशांनाही करोनाचा फटका बसला आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्येही (युएई) करोनाचे करोनाचे आठ हजारहून अधिक (गुरुवारी २३ एप्रिल २०२० पर्यंत) रुग्ण अढळून आले आहेत. युएईमध्ये ५० हून अधिक जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर देशामधील अनेक भागांमध्ये लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या असून अत्यावश्यक कामासाठी बाहेर जायचे असल्यास पोलिसांकडून विशेष पास घ्यावा लागणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. अशातच एका व्यक्तीने पोलिसांना एक आगळावेळा प्रश्न विचारुन गोंधळात टाकल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या गोंळवणाऱ्या प्रश्नावर पोलिसांनाही भन्नाट उत्तर दिलं असून सध्या या प्रश्नाची सोशल नेटवर्किंगवर चर्चा आहे.

गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, दुबईमधील एका व्यक्तीने पोलिसांकडे चक्क एका पत्नीच्या घरुन दुसऱ्या पत्नीच्या घरी जाण्यासाठी पास मिळू शकतो का अशी विचारणा केली आहे. झालं असं की, सामान्य नागरिकांना लॉकडाउनसंदर्भात असणाऱ्या प्रश्नांचे निरसन करण्यासाठी दुबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांशी स्थानिक रेडीओ स्टेशनच्या माध्यमातून लाइव्ह संवाद साधण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी एका व्यक्तीने “माझे दोन महिलांशी लग्न झालं आहे. मला एका घरून दुसऱ्या घरी जाण्यासाठी परवाना मिळू शकेल का?” असा प्रश्न लाइव्ह कार्यक्रमात पोलीस अधिकाऱ्यांना विचारला. हा प्रश्न ऐकून नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आलेले दुबई वाहतुक पोलिसांचे संचालक ब्रिगेडीयर सैफ मुहीर अल् मझरुई यांना हसू आले. मात्र त्यांनी या प्रश्नाला, “परवाना मिळाला नाही हे एका पत्नीला न भेटण्याचं चांगलं कारण ठरु शकतं” असं मजेदार उत्तर दिलं.

मात्र अशाप्रकाराचा प्रश्न विचारणारा हा पहिला व्यक्ती नसल्याचेही पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. “आम्हाला अशाप्रकारचा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. मात्र परवाना एकदाच वापरण्यासाठी दिला जातो. त्यामुळे अत्यंत महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडायचे असल्यास परवान्यासाठी अर्ज करता येईल,” असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. लोकांनी कमीत कमी वेळा घराबाहेर पडावे म्हणून आम्ही निर्बंध लादल्याने कोणत्याही कारणसाठी आम्ही परवाना देऊ शकत नाही, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये किंवा आपत्कालीन सेवेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना वगळता कोणालाही बाहेर पडता यणार नाही असं पोलिसांनी सांगितलं आहे.