एक ब्रिटिश व्यक्ती आणि त्याच्या पत्नीच्या उंचीत असलेल्या फरकामुळे त्या दोघांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. जेम्स आणि क्लोइ लस्टेड यांच्यातील उंचीमध्ये सुमारे दोन फुटांचा फरक आहे. जेम्सची उंची ३ फूट ७ इंच तर क्लोइची ५ फूट ५ इंच एवढी उंची आहे. जेम्सला डायस्ट्रोफिक डायस्प्लासिया हा दुर्मिळ अनुवांशिक विकार आहे. या विकारामुळे त्याचं कधी लग्न होईल असं जेम्सला वाटलं नव्हतं. पंरतु क्लोइ या पेशाने शिक्षक असलेल्या मुलीशी त्याचं ५ वर्षापूर्वी लग्न झालं. आता त्यांना ऑलिव्हिया नावाची २ वर्षाची मुलगी आहे. जेम्स अभिनेता आणि टीव्ही प्रेझेंटर म्हणून काम करतो.

2 जून रोजी त्यांनी विवाहित जोडप्यांमधील सर्वात जास्त उंचीच्या फरकाचा विक्रम मोडला. त्यांच्या उंचीमध्ये फरक असला तरी बाकी अनेक गोष्टींमध्ये साम्य आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने या जोडप्याचा व्हिडिओ त्यांच्या युट्युबवरून प्रसारित केला आहे. त्या व्हिडीओमध्ये त्यांनी एक विवाहित जोडपं आणि व्यक्ती म्हणून आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे.

दोघांची पहिली भेट कशी झाली?

२०१२ मध्ये एका पबमध्ये दोघांची भेट झाली. क्लोइला नेहमीच उंच पुरुष आवडत होते. परंतु जेम्सच्या प्रेमात पडल्यानंतर ती बदलली. सुरुवातीला तिला तिच्या निवडीवर लोकांच्या काय प्रतिक्रिया असतील याबाबत शंका होती. पण आपण कोणावर प्रेम करायचं हे फक्त आपणच निवडू शकतो या मतावर ती ठाम होती. “आमच्या प्रेमकथेने आम्हाला आणि इतरांना शिकवले की एखाद्या पुस्तकाच्या कव्हरवरून पूर्ण पुस्तक तुम्ही जज करू शकत नाही. व्यक्ती कोण आहे याची पर्वा न करता प्रेम करा”, असंही क्लोइ म्हणते. जेम्सने आपली उंची स्वतःच्या कामात कधीच येऊ दिली नाही. डेली पोस्टच्या वृत्तानुसार, जेम्सची २०१७ साली कोन्वी कौन्सिलवर निवड झाली. सोबतच जेम्स दिव्यांग स्पोर्ट वेल्सचा विश्वस्त देखील आहे. आणि वेल्श कन्झर्व्हेटिव्हचा पहिला दिव्यांग चॅम्पियन हा बहुमानसुद्धा त्याने मिळवलेला आहे.