Crab Eats Snake Head in Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक आणि थरारक व्हिडीओ वेगाने प्रसारित होत आहे, ज्याने सर्वांच्या कल्पनाशक्तीला अक्षरशः हादरा दिला आहे. सामान्यतः साप हा भयंकर आणि चपळ शिकारी म्हणून ओळखला जातो. मात्र, या व्हिडीओमध्ये नेमकी उलटी परिस्थिती पाहायला मिळते. येथे शिकारीच शिकार झाल्याचं विचित्र आणि भयावह चित्र उभं राहतं आणि तेही एका लहानशा दिसणाऱ्या खेकड्यामुळे!
व्हिडीओच्या सुरुवातीला एक खेकडा झाडाच्या खोडावर सावकाश चढताना दिसतो. सुरुवातीला हे दृश्य अगदी साधं वाटतं, जणू काही रोजचंच. पण कॅमेरा जसजसा जवळ येतो, तसतसं वास्तव अंगावर शहारे आणणारं ठरतं. खेकड्याच्या मजबूत पंजात सापाचं वेगळं झालेलं डोकं घट्ट अडकलेलं असतं. खाली जमिनीवर सापाचं उरलेलं शरीर निष्प्राण अवस्थेत पडलेलं दिसतं. या दृश्यावरून स्पष्ट होतं की सापाचा मृत्यू झालेला आहे.
अंगावर काटा आणणारा क्षण
या व्हिडीओतील सर्वांत भयानक आणि धक्कादायक क्षण तो असतो, जेव्हा खेकडा अजिबात भीती न बाळगता, त्या सापाच्या डोक्याला कुरतडायला सुरुवात करतो. तो इतक्या सहजतेने ते खातो, जणू एखादा माणूस काकडी खात आहे. सापाचे डोळे उघडेच दिसतात आणि काही क्षण हलकासा हालचालींचा भास होतो, ज्यामुळे हे दृश्य आणखी भीतीदायक बनतं. हा क्षण पाहताना प्रेक्षक अक्षरशः थिजून जातात.
तज्ज्ञ काय सांगतात?
या विचित्र घटनेविषयी तज्ज्ञांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांच्या मते, जमिनीवर राहणारे अनेक खेकडे हे ‘संधिसाधू’ स्वभावाचे असतात. ते सहसा पानं, फळं किंवा सडलेले अन्न खातात; मात्र जेव्हा त्यांना मांस मिळतं, तेव्हा ते तेही नाकारत नाहीत. त्यामुळे खेकड्यानं सापाचं डो,कं खाणं पूर्णपणे अशक्य नाही.
मात्र, खरा प्रश्न असा उरतो की, खेकड्यानं सापाची प्रत्यक्ष शिकार केली होती का? की त्याला आधीच मृतावस्थेतील साप सापडला? या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर अद्याप मिळालेलं नाही. विशेष म्हणजे सापाचं डोकं ज्या पद्धतीनं वेगळं झालेलं दिसतं, ती पद्धत अत्यंत असामान्य आणि गूढ वाटते.
व्हिडीओने का उडवली खळबळ?
हा व्हिडीओ पाहणाऱ्यांना एकाच वेळी कुतूहल, भीती व आश्चर्य अशा तिन्ही भावना अनुभवायला लावतो. निसर्गात घडणाऱ्या अनपेक्षित आणि विचित्र घटनांचं हे एक ठळक उदाहरण मानलं जात आहे. अनेकांनी या व्हिडीओवर आश्चर्य व्यक्त करीत प्रतिक्रिया दिल्या आहेत; तर काहींनी यामागचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
निसर्गाचा हा अनपेक्षित खेळ पाहून एक गोष्ट मात्र निश्चित जाणवते की, जगात काहीही घडू शकतं, आणि प्रत्येक वेळी मोठाच बलवान असेल, असं नाही.
