Viral Video : उद्या २८ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. उद्या सगळीकडे विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष दिसेल आणि बघता बघता लाडका बाप्पा आपला निरोप घेईल. गणेशोत्सवादरम्यान गणपती बाप्पासाठी अनेक इन्फ्लुएंसर, कलाकार, कन्टेन्ट क्रिएटर यांनी व्हिडीओच्या माध्यमातून अनेक संदेश लोकांपर्यंत पोहचवले. गणपती डेकोरेशन, विविध प्रकारचे मोदक, कापसाची कंठी, खास रांगोळी अशा विविध माध्यमांतून कलाकार मंडळींनी गणपती बाप्पाच्या प्रति आपले प्रेम व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त केले. तर आज सोशल मीडियावर एका कलाकारानेसुद्धा गणपती बाप्पासाठी खास कला सादर केली आहे. एक कलाकार काही वस्तूंची एका कागदावर रचना करून, वस्तूंच्या सावलीद्वारे भिंतीवर गणपती बाप्पाचे चित्र तयार करतो..
…तर आज एका कलाकाराने त्याच्या कौशल्याच्या जोरावर वस्तूंच्या सावलीतून बाप्पाची खास झलक दाखवली आहे. तरुण एका छोट्या टेबलावर अनेक पेपर कप घेऊन त्यांना एकावर एक ठेवून त्यांचा थर रचून घेतो. कारण- पेपरकप एखाद्या खांबासारखे दिसावे म्हणून त्यांची अशी रचना करून घेण्यात आली आहे. त्यानंतर कागदावर पेपर कपसोबत अनेक वस्तू रचून ठेवण्यात आल्या आहेत. जेव्हा तरुण या कागदावर ठेवलेल्या वस्तूंना अलगद फिरवतो, तेव्हा भिंतीवर या वस्तूंची सावली पडून बाप्पाचे चित्र तयार होते, जे पाहून खरंच तुम्हाला आश्चर्य वाटेल. कलाकाराची अद्भुत कला एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…




व्हिडीओ नक्की बघा :
सावलीतून बाप्पाचे दर्शन :
घराची लाईट बंद करून एका कागदावर या तरुणाने काही वस्तू रचून ठेवल्या आहेत. तसेच या वस्तूंवर एक प्रकाश सोडण्यात आला आहे, त्यामुळे या वस्तूंची सावली समोरच्या भिंतीवर पडताना दिसून येत आहे. तरुण जसं जसं कागद अलगद टेबलावर फिरवतो, तसं भिंतीवर गणपती बाप्पाचे चित्र तयार होताना दिसतं. गणपती बाप्पाचे चित्र भिंतीवर अगदी हुबेहूब दिसावे यासाठी तरुणाने अगदी बारकाईने या वस्तूंची रचना कागदावर करून घेतली आहे, जे पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @mahiartist या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. महेश कापसे असे या युजरचे नाव आहे.अनेकांनी हा व्हिडीओ पाहून कलाकाराचे खूप कौतुक केलं आहे. ‘अद्भुत’, ‘खूप छान’, ‘सलाम तुझ्या कलेला’ अशा शब्दांत अनेकजण कलाकाराच्या कलेची प्रशंसा करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. याआधीसुद्धा युजरने अनेक कलाकार, संगीतकार, क्रिकेटर यांचे चित्र सावलीच्या मदतीने भिंतीवर प्रदर्शित केले आहे. तर गणेशोत्सवादरम्यान त्याने आपल्या कलेचा उपयोग करून गणपती बाप्पाचे चित्र भिंतीवर प्रदर्शित केले आहे, जे सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.