मंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे २६ जुलैच्या आठवणी जाग्या झालेल्या. जागोजागी साचलेल्या पाण्यातून वाट काढताना मुंबईकरांचे अक्षरशः हाल झाले होते. मुंबई शहर आणि उपनगरात मोठय़ा प्रमाणात पडलेल्या पावसामुळे मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले. तीन ते साडेतीन फुटांपर्यंत असलेल्या पाण्यामुळे बेस्ट बस, टॅक्सी, रिक्षा यासह खासगी वाहनांना वाट काढताना मोठी समस्या येत होती. वाहतूकसेवेचा बोजवारा उडाल्याने लोक पाण्यातून चालत जाण्यालाच प्राधान्य देत होते.

वाहत्या पाण्यामुळे अनेक जलचर थेट रस्त्यावर येत होते. मुसळधार पावसामुळे चक्क एक मगर विक्रोळी-जोगेश्वरी येथील लिंक रोडवर आली आणि लोकांमध्ये एकच धांदल उडाली. विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोडवर पवई तलावात मगर असल्याचं याआधी स्पष्ट झालंय. मध्यंतरी तलावात मगरींची संख्या वाढली असल्याचंही बोललं जात होतं.

याशिवाय परळच्या हिंदमाता इथे साचलेल्या पाण्यात एक मोठा मासा आढळून आला. आता हा मासा नेमका कुठून आला हे सांगता येत नसले तरीही पाणी ओसरल्यावर मासा दिसल्याने त्याच्याबाबत या भागात बरीच चर्चा सुरु होती. हिंदमाता हा सखल भाग असल्यामुळे पाऊस पडला की याठिकाणी जास्त पाणी साचते. पाणी साचल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.