Crocodile On Road Video : रस्त्यावर मगर दिसणे हा एक दुर्मीळ क्षण आहे. पण, गुजरातमध्ये रस्त्यावर सिंह आणि मगर दिसणं हे स्थानिकांसाठी आता मोठी गोष्ट नाही. वन्यजीव असलेल्या भागात राहणाऱ्यांना रोज रस्त्यावर अशा अनेक प्राण्यांचे दर्शन घडते. सध्या सोशल मीडियावर अशाच रस्त्यावर फिरणाऱ्या मगरींचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून अनेकांनी भीती व्यक्त केली, कारण पावसाळ्यात मगर रस्त्यावर आली हे समजू शकतो, कडक उन्हात अशाप्रकारे मगरी रस्त्यावर फिरतात हे चित्र लोकांना दुर्मीळ वाटतेय.

बुधवारी होळीच्या दिवशी गुजरातमधील शहरी भागात दोन भल्यामोठ्या मगरी रस्त्यावर फिरताना दिसल्या, मगरींच्या या अचानक एन्ट्रीने रस्त्यावरून प्रवास करणारेही घाबरले, काही जण आश्चर्यचकित झाले. दरम्यान, दोन्ही मगरींना वन्यजीव पथकांनी यशस्वीरित्या रेस्क्यू केलं आहे, ज्याचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होतोय.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सुटका करण्यात आलेल्या मगरींपैकी एक ६ फूट लांब आणि दुसरी सुमारे १० फूट लांब आहे. रात्री उशिरा दोन्ही मगरी पाण्यातून बाहेर आल्या होत्या. त्यांना सुरक्षितरित्या पाण्यात सोडण्यात आले.

व्हिडीओत पाहू शकता की, मगरी रस्त्यावर अगदी आरामात चालताना दिसतायत, जणू काही त्यांचे चालण्याचे ते एक परिचित ठिकाण आहे.

हा व्हिडीओ एक्सवर @MyVadodara या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, चिल करा, हा वडोदरा आहे. वडोदरा येथील उर्मी पुलावर एक मगर दिसली!” यावर लोकांनी मगर खूप लवकर बाहेर पडल्या असे लिहिले; त्यावर उत्तर देण्यात आले की, गरमी आहे भाऊ.