गुजरातची आर्थिक राजधानी असलेल्या सुरतला डायमंड सिटी असे म्हणतात. सुरतमध्ये महिधपुरा आणि वराछा परिसरामध्ये हिऱ्यांच्या दुकानाची बाजारपेठ आहे. तिथे रस्त्यावर बसून हिऱ्यांची खरेदी आणि विक्री केली जाते. तर आज सोशल मीडियावर याच परिसरातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जिथे हिरे रस्त्यावर पडले आहेत अशी अफवा पसरली आणि अनेक नागरिक हे ऐकताच रस्त्यावर हिरे शोधण्यास सुरवात करायला लागले. पण, अनेक तास हिऱ्यांचा शोध घेणाऱ्या लोकांना यामागील सत्य कळाल्यानंतर अनेकजण निराश झाले.
व्हायरल व्हिडीओ गुजरातची आर्थिक राजधानी सुरतचा आहे. काही दुचाकीस्वार रस्त्यावरून जाताना दिसत आहेत, तर रस्त्याच्या अगदी मधोमध आणि रस्त्याच्या कडेला अनेकजण रस्त्यावर काहीतरी शोधताना दिसत आहेत. तर प्रकरण असे आहे की, डायमंड सिटी सुरतमध्ये रस्त्यावर हिरे पडले आहेत अशी अफवा पसरवण्यात आली होती आणि याच कारणाने अनेकजण रस्त्यावर हिरे शोधायला लागले आणि एकच खळबळ उडाली. अनेक नागरिक रस्त्यावर नेमकं काय शोधत आहेत ? याचे कारण अनेक दुचाकीस्वारांना माहीत नसूनही ते आश्चर्याने हिरे शोधणाऱ्यांकडे बघताना दिसून येत आहेत. तसेच काहीजण ही घटना स्वतःच्या मोबाईलमध्ये शूट करून घेत आहेत. रस्त्यावर हिरे शोधणाऱ्या नागरिकांची गर्दी एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच.




व्हिडीओ नक्की बघा :
सत्य कळताच सगळेच झाले निराश :
रस्त्यावर हिरे पडले आहेत हे ऐकताच बाजारात गोंधळ सुरू झाला आणि आरडाओरड सुरू झाली. लोकांनी नीट रस्त्यावर पाहिलं तर लहान हिरे खरचं पडले होते. त्यानंतर पडलेले हिरे गोळा करण्यासाठी रस्त्यावर अनेकांची गर्दी जमली. पण, रस्त्यावर पडलेले हिरे शोधण्यात अनेक लोकांनी बराच वेळ फुकट घालवला. कारण रस्त्यावर पडलेले हिरे खोटे असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच हे खाणीतले हिरे नसून लॅबमध्ये तयार करण्यात आलेले हिरे आहेत, ज्यांना फारशी किंमत नसते. हिरे शोधण्यासाठी वेळ देणारे अनेक नागरिक हे ऐकून निराश झाले.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @kalpeshpraj80 या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर पडलेले हिरे गोळा करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक हातातील काम सोडून हिरे शोधण्यात व्यस्त झाले आहेत. प्रत्येकजण बारकाईने हिरे शोधत आहेत. तसेच या दरम्यान एका व्यक्तीने हा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला आहे; जो सध्या खूपचं व्हायरल होत आहे.