52 Litres of Petrol in a 45-Litre Tank Here’s What Really Happened: पेट्रोलचे वाढते दर आणि पेट्रोल पंपांवरील फसवणुकीच्या तक्रारी यामुळे वाहनचालक आधीच सावध झाले आहेत. अशातच उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका ग्राहकाने असा दावा केला आहे की, त्याच्या कारची पेट्रोल टाकी केवळ ४५ लिटर क्षमतेची असतानाही पेट्रोल पंपावर त्यात तब्बल ५२ लिटरपेक्षा जास्त पेट्रोल भरल्याची पावती देण्यात आली. हा प्रकार समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कानपूरमधील हर्ष नगर भागातील एका पेट्रोल पंपावर हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाहनमालक चरण सिंह हे शनिवारी त्यांच्या नव्या कारसह पेट्रोल भरण्यासाठी या पंपावर गेले होते. त्यांनी टाकी पूर्ण भरण्यास सांगितले. त्यानंतर पेट्रोल भरल्यानंतर त्यांना देण्यात आलेली पावती पाहून ते अक्षरशः चक्रावून गेले.
कारण पावतीवर ५१.३ लिटरपेक्षा अधिक पेट्रोल भरल्याची नोंद होती. विशेष म्हणजे संबंधित कारच्या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्या वाहनाच्या टाकीची क्षमता फक्त ४५ लिटर आहे. एवढेच नव्हे तर कार खरेदी करताना कंपनीकडून आधीच सुमारे ५ लिटर पेट्रोल टाकीत टाकण्यात आले होते, असेही चरण सिंह यांनी सांगितले.
यामुळे त्यांच्या मनात संशय निर्माण झाला. आधीच टाकीत पेट्रोल असताना पुन्हा ५२ लिटर पेट्रोल कसे मावू शकते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांनी याबाबत पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना जाब विचारला. मात्र, त्यांच्या म्हणण्यानुसार समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
चरण सिंह यांनी तातडीने या प्रकरणाची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे केली. जिल्हा प्रशासन, पुरवठा विभाग आणि बांट-माप विभागालाही त्यांनी याबाबत माहिती दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी संबंधित मशीनची नोजल सील केल्याचे सांगितले जात आहे.
ग्राहकाच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने एकाच वेळी ४१ लिटर पेट्रोल भरले. त्यानंतर उर्वरित पेट्रोल दुसऱ्या टप्प्यात भरल्याचे सांगण्यात आले. अखेर एकूण आकडा ५२ लिटरच्या पुढे गेला. हा आकडा पाहूनच ग्राहकाला धक्का बसला.
या संपूर्ण प्रकाराची खात्री करण्यासाठी चरण सिंह यांनी संबंधित कार कंपनीच्या प्रतिनिधीलाही पेट्रोल पंपावर बोलावले. त्यानेही वाहनाची अधिकृत टाकी क्षमता ४५ लिटर असल्याचे स्पष्ट केल्याचा दावा ग्राहकाने केला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे पेट्रोल पंपांवरील मोजमाप आणि पारदर्शकतेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. खरंच टाकीत ५२ लिटर पेट्रोल भरले गेले की मोजमापात काही चूक झाली? ग्राहकाचा दावा खरा आहे की यामागे काही तांत्रिक कारण आहे? याचे उत्तर आता अधिकृत चौकशीनंतरच समोर येणार आहे.

सध्या मात्र या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून वाहनचालकांमध्येही याबाबत उत्सुकता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. चौकशी अहवालात नेमके काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
