Cycle mechanic son success video: सोशल मीडियाच्या जगात दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हसवतात, काही थक्क करतात, तर काही थेट मनाला भिडतात. अशाच काही व्हिडीओंमधून सामान्य माणसाच्या आयुष्यातील असामान्य क्षण आपल्यासमोर येतात. हे क्षण कोणत्याही देखाव्याशिवाय, कुठलाही अभिनय न करता आपोआप प्रेक्षकांच्या काळजात घर करतात.

विशेषतः आई-वडील आणि मुलांमधील नातं, त्याग, संघर्ष व यशाची कहाणी जर कॅमेऱ्यात कैद झाली, तर ती प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आणते. सध्या सोशल मीडियावर असाच एक भावनिक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून हजारो लोक भावूक झाले आहेत. हा व्हिडीओ केवळ एका कुटुंबाची कथा नाही, तर तो असंख्य कष्टकरी पालकांचे स्वप्न आणि त्यासाठी केलेल्या संघर्षाची गोष्ट बनली आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगा आपल्या वडिलांना आयुष्यातील सर्वांत मोठं सरप्राईज देताना दिसतो. वडील एका छोट्याशा सायकलदुरुस्तीच्या दुकानात नेहमीप्रमाणे काम करत असतात. त्यांचे हात ग्रीसने भरलेले आहे, चेहऱ्यावर आयुष्यातील कष्ट केल्याचा संघर्ष दिसतो. तेवढ्यात त्यांचा मुलगा दुकानात येतो आणि शांतपणे त्यांच्या हातात एक लिफाफा देतो. सुरुवातीला वडील त्याकडे फारसं लक्ष देत नाहीत; पण जेव्हा तो लिफाफा उघडतात, तेव्हा त्यांच्या आयुष्याचा अर्थच बदलून जातो.

तो लिफाफा म्हणजे त्यांच्या मुलाचं CISF (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल)मधील सरकारी नोकरीचं जॉइनिंग लेटर असतं. ते वाचताच वडिलांच्या डोळ्यांत पाणी येतं. त्यांच्याकडे शब्द नसतात बोलायला, हात थरथर कापू लागतात आणि क्षणातच त्या कठोर दिसणाऱ्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. मुलाच्या यशात त्यांना स्वतःचे वर्षानुवर्षांचे कष्ट, उपासमार, त्याग आणि स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान दिसतं. हाच तो क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि पाहता पाहता व्हायरल झाला.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @sonuydv87 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, काही तासांतच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून, अनेकांनी आपल्या भावना प्रतिक्रियांद्वारे व्यक्त केल्या आहेत. एका युजरनं लिहिलं, “प्रत्येक बापासाठी हा आयुष्यातील सर्वांत मोठा आणि अभिमानाचा क्षण असतो.”

तर दुसऱ्यानं म्हटलं, “हा व्हिडीओ म्हणजे मुलाच्या मेहनतीची आणि बापाच्या संघर्षाची जिवंत कहाणी आहे.” काहींनी याला “खऱ्या अर्थानं देशसेवेचा अभिमान” असं म्हटलं; तर अनेकांनी वडिलांच्या डोळ्यांतील आनंदाश्रूंना सलाम केला. हा व्हिडीओ केवळ भावूक करणारा नसून, तो प्रेरणा देणाराही आहे. कष्ट, संयम आणि आई-वडिलांच्या आशीर्वादातून स्वप्नं कशी पूर्ण होतात, याचं उत्तम उदाहरण आहे.