Dadar Poster Make MI & Modi Fans Crazy: लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात होणारे मतदान आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. मुंबई, ठाण्यासह अत्यंत महत्त्वाच्या लढतींसाठी २० मे ला सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरु होईल. अर्थात शेवटचे ४८ तास शिल्लक असताना दोन्ही गटांच्या प्रचारकार्याने सुद्धा कमाल वेग धरला आहे. शुक्रवारी, १७ मे ला मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात स्वतः नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेत मुंबईतील सहा उमेदवारांसाठी मत मागितले होते. तर महाविकास आघाडीच्या सभेत नुकत्याच तुरुंगातून बाहेर आलेल्या अरविंद केजरीवाल यांनी हजेरी लावली होती. प्रचारसभांच्या निमित्ताने मुंबई शहरात ठिकठिकाणी पोस्टर्स लागले आहेत पण यातील एक पोस्टर आता अनेकांच्या स्टेटसवर तुफान शेअर होताना दिसतंय. लोकसभा निवडणुकांचा मुंबई इंडियन्सच्या पराभवही संबंध जोडून लावण्यात आलेल्या या पोस्टरची प्रचंड चर्चा होतेय. नेमकं असं यात म्हटलंय तरी काय चला पाहूया…

क्रिकेट व राजकारण अशा दोन्हीमध्ये रस असणाऱ्यांच्या Whatsapp Status, Instagram स्टोरीज, फेसबुक व X वरील अकाउंटवर हे पोस्टर शेअर केलं जातंय. प्राप्त माहितीनुसार मुंबईतील दादर भागात हे पोस्टर लावण्यात आलं आहे. आपल्या माहितीसाठी सांगायचं तर काल, १७ मे रोजी मुंबई प्रचारसभा होत असताना दुसरीकडे मुंबईतच वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स व लखनौ सुपर जाएंट्स यांच्यात सामना देखील सुरु होता. या सामन्यात अवघ्या १८ धावांच्या फरकाने लखनौने मुंबईवर मात केली. मुंबई इंडियन्सच्या संघाचा हा यंदाच्या आयपीएलमधील शेवटचा सामना व १० वा पराभव ठरला.

हे ही वाचा<< २ चेंडूंवर, २ षटकार व सचिन तेंडुलकरच्या लेकाची माघार; अर्जुनला खुन्नस देणं पडलं महाग, MI vs LSG ची नाट्यमय ओव्हर पाहा

मुंबई इंडियन्सच्या अपयशामागे कदाचित अनेक कारणे असतील मात्र चाहत्यांच्या मते कर्णधार बदलल्यानेच मुंबई इंडियन्सची अशी अवस्था झाली आहे. जेव्हापासून रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आलं तेव्हापासून मुंबईचे पराभव झाले आणि अवस्था बिकट झाली असंही चाहत्यांचं म्हणणं होतं, नेमकं हेच म्हणणं धरून लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यात आला आहे. “परत सांगतो देशाचा कर्णधार बदलून देशाची मुंबई इंडियन्स करू नका!”असं लिहिलेला पोस्टर आता मुंबईतच झळकत आहे.

दादरमधील पोस्टर पाहून मुंबई इंडियन्स व मोदींचे समर्थक म्हणतात सही बात है!

दादरमधील पोस्टर पाहून मुंबई इंडियन्स व मोदींचे समर्थक झाले लोटपोट (फोटो: सोशल मीडिया)

दरम्यान, अशी पोस्टरबाजी पहिल्यांदाच झालेली नाही. मुंबईतच नव्हे तर पुण्यातही ठिकठिकाणी मतदानाच्या आधी असे पोस्टर लावण्यात आले होते. अनेकदा काही इन्फ्लुएन्सर्सनी सुद्धा मतदारांना जागृत करण्यासाठी असे प्रयोग केले होते. तुमचं या पोस्टरबाबत काय मत आहे, खरंच कर्णधार बदलल्याने मुंबईचा संघ पराभूत झाला का? किंवा देशाचा कर्णधार बदलल्याने देशाचीही अशीच स्थिती होऊ शकते का? हे कमेंट करून नक्की कळवा.