Dahihandi 2026 Viral Video : गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर सध्या ठिकठिकाणी गोविंदा पथकांची सराव शिबिरे जोरात सुरू आहेत. त्यापैकीच एका सराव शिबिरातील नऊ वर्षांच्या एका चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दहीहंडीच्या पाचव्या थरावर उभं राहून या चिमुकलीने समाजातील वाढत्या महिला अत्याचारावर आणि लहान मुलींच्या सुरक्षेवर अत्यंत रोकठोक प्रश्न उपस्थित केले आहेत. तिचा हा धाडसीपणा आणि विचार ऐकून उपस्थित सर्वच अवाक झाले आहेत.
दहीहंडीच्या पाचव्या थरावर अत्यंत आत्मविश्वासाने उभी राहिलेली ही चिमुकली म्हणते, “या थरावरून माझा आवाज ऐका. मी एवढीशी आहे म्हणून माझं म्हणणं छोटं आहे का? मी फक्त नऊ वर्षांची आहे, माझ्या हातात पुस्तकं आणि खेळणी असायला हवीत. डोळ्यांत स्वप्नं असायला हवीत; भीती नाही. पण, आज कित्येक छोट्या मुलींवर अन्याय होतोय, त्यांचं बालपण हिरावून घेतलं जात आहे. म्हणून मी आज या दहीहंडीच्या थरावरून समाजाला एक प्रश्न विचारते… मुलगी असणं ही तिची चूक आहे का?”
आपल्या भाषणात पुढे तिने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सांगत स्त्रीसुरक्षा आणि सन्मानाला महाराजांनी कशा प्रकारे सर्वोच्च प्राधान्य दिले होते, याची आठवण करून दिली.
वयाने लहान असली तरी या चिमुकलीची हिंमत, कल्पकता आणि आत्मविश्वास मोठा आहे. दहीहंडीच्या थरावर चढून तिने केवळ मानवी मनोरा रचला नाही, तर संपूर्ण समाजाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम केले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, नेटकरी या चिमुकलीच्या धैर्याचे आणि विचारांचे भरभरून कौतुक करत आहेत.
धाडसी चिमुकलीचा हा व्हिडीओ hanuman_nagar_govinda_pathak या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. याच गोविंदा पथकात शेवटच्या थरावर उभी राहून ही मुलगी ज्या विश्वासाने बोलतेय, त्याचे कौतुक केले जात आहे. मुलींच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न फक्त बोलण्यापुरता नको, तर प्रत्येकाने त्यासाठी आवाज उठवण्याची गरज आहे, असा संदेश तिने यातून दिला आहे. सोशल मीडियावर अनेक जण चिमुकलीच्या धाडसाचे कौतुक करीत आहेत.
