Dahihandi Theme For The Dohale Jevan Baby Shower : आई होणे हा महिलांच्या जीवनातील सुंदर अनुभव असतो. कुटुंबातील गरोदर महिलेचे खूप कोडकौतुक केले जाते. कुणीतरी येणार येणार गं, असे म्हणत डोहाळजेवणाचा कार्यक्रम ठेवाला जातो. या कार्यक्रमासाठी झोका, धनुष्यबाण, फुलांची सजावट व पारंपरिक गाणी लावण्यात येतात. पण, हल्ली वेगवेगळ्या थीमवर आधारित डोहाळजेवणाचा कार्यक्रम ठेवला जातो. सोशल मीडियावर मुंबईतील डोहाळजेवणाच्या एका कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात चक्क दहीहंडी सणावर आधारित थीमवर डोहाळजेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यातून मुंबईकरांचे दहीहंडी सणावर असलेले अतूट प्रेम दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या अनोख्या डोहाळजेवणाच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ अनेक युजर्सनाही चांगलाच आवडला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दहीहंडी स्पेशल डोहाळजेवणाचा कार्यक्रम सुरू आहे. यावेळी पाहुण्यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. यावेळी महिलांनी होणाऱ्या आईचे औक्षण करून ओटी भरण्यात आली. विशेष म्हणजे कार्यक्रमाची सर्व सजावट खास भगवान श्रीकृष्णावर करण्यात आली होती. यावेळी मुलगा होणार की मुलगी हे ओळखण्यासाठी एक छोटासा मजेशीर खेळ खेळण्यात आला. त्यासाठी छताला दोन सजवलेल्या हंडी बांधण्यात आल्या होत्या. त्यातील एका हंडीत मुलगी आणि दुसऱ्यात मुलाची छोटी प्रतिकृती होती. जोडप्याने एक हंडी निवडून, ती फोडायची होती. अखेर दोघांच्या मताने त्यांनी एक हंडी निवडली आणि त्यातून मुलाची प्रतिकृती खाली पडली. त्यावरून मुलगा जन्माला येईल, असे मानत, खास कृष्ण जन्मला हे गाणे वाजवून जोडप्याने नाचण्याचा आनंद घेतला. इतकेच नाही तर यावेळी खास दहीहंडीची गाणी वाजवून, त्यावर काही तरुणांनी, बोल बजरंग बली की जय, असे म्हणत नाचण्याचा आनंद घेतला. विशेष म्हणजे केवळ तरुणाच नाही, तर त्यांच्यात एका वृद्ध काकादेखील आनंदाने नाचताना दिसले; ज्यांना फॉलो करीत इतर तरुण पाहुणे मंडळी नाचत होती. त्यानंतर जोडप्याने थीमनुसार खास फोटो सेशनदेखील केले. मुंबईत दहीहंडीच्या वेळी ज्या प्रकारे पारंपरिक गाणी म्हणत तरुण नाचतात अगदी तशाच प्रकारे ही तरुण मंडळी या कार्यक्रमात नाचत होती. यावेळी कार्यक्रमात एक वेगळाच माहोल क्रिएट केला. Read More Trending News : साफसफाईची जीवघेणी हौस! कांजूरमार्गमधील इमारतीतील धडकी भरवणारे दृश्य; Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का या अनोख्या डोहाळजेवणाच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून युजर्सही त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, खूप मस्त यार, किती भाग्यवान आहे ते बाळ. त्याचे किती लाड होतील मस्त. मी आतुर आहे तो जेव्हा जन्मला येणार तेव्हाचा व्हिडीओ बघण्यासाठी. किती धमाल असेल.