Viral stunt video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हसवणारे असतात, काही भावूक करतात, तर काही असे असतात की, ते पाहिल्यावर अंगावर काटा येतो. माणसाची थोडीशी निष्काळजीपणा, क्षणिक मस्ती किंवा ‘काहीतरी वेगळं’ करण्याची हौस कधी जीवावर बेतू शकते, याची जाणीव अशा व्हिडीओंमधून वारंवार समोर येत असते. विशेषतः सार्वजनिक ठिकाणी, जिथे सुरक्षेचे नियम पाळणं अत्यंत गरजेचं असतं, तिथे जर कोणी धाडसाच्या नावाखाली धोकादायक प्रयोग करत असेल, तर ते केवळ स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठीही संकट ठरू शकतं. सध्या असाच एक थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून, तो पाहणाऱ्यांच्या मनात भीतीसोबतच संतापही निर्माण करत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका मोकळ्या मैदानात उभारलेला मोठा पाळणा दिसतो. या पाळण्यावर अनेक लोक बसलेले असून, तो नेहमीप्रमाणे वर-खाली हालचाल करीत आहे. पण , या पाळण्याचा आनंद घेण्याऐवजी काही तरुणांनी त्यावर धोकादायक स्टंट केले आहे. कोणतीही सुरक्षिततेची व्यवस्था नसताना, तीन तरुण पाळण्याखाली येताच त्याला बाहेरून लटकतात आणि स्वतःच्या वजनाने वर जातात. पाळणा वर गेल्यानंतर ते पुन्हा जोरात खाली येतात, ज्यामुळे पाळण्याचा वेग आणखी वाढतो.
हा संपूर्ण प्रकार अत्यंत धोकादायक असून, क्षणभराचा तोल गेला असता, गंभीर अपघात होऊ शकला असता. या सगळ्याच्या दरम्यान, एक व्यक्ती स्वतःचा सेल्फी व्हिडीओ बनवत सगळा थरारक प्रसंग मोबाईल कॅमेऱ्यात शूट करताना दिसतो. विशेष म्हणजे, आजूबाजूला उभे असलेले लोक केवळ प्रेक्षक बनून हे सगळं पाहत राहतात, कुणीही थांबवण्याचा किंवा इशारा देण्याचा प्रयत्न करत नाही. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @rayprodip470 या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला तब्बल १.६ दशलक्षापेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
पाहा व्हिडीओ
या व्हिडीओखाली सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक युजर्सनी हा प्रकार पाहून संताप व्यक्त केला असून, “हा प्रकार थांबवला पाहिजे”, “एक चूक आणि थेट मृत्यू”, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी आयोजक आणि प्रशासनावरही प्रश्न उपस्थित करीत, सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेची योग्य व्यवस्था नसल्याची टीका केली आहे. तर काही युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया करत, “खरी मज्जा तर बाहेर लटकणारेच घेत आहेत”, अस म्हटले. एका युजरने हा व्हिडीओ भारतातील नसून बांगलादेशमधील असल्याचा दावाही केला आहे.
पण हा व्हिडीओ कुठला आहे याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. तरीही हा प्रकार पाहून अनेकांनी अशा स्टंट्सपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी किंवा थोड्याशा मजेसाठी स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणे किती घातक ठरू शकते, याचे हे जिवंत उदाहरण असल्याचे अनेकांनी नमूद केले आहे.

