Heart Touching Viral Video of Daughter and Parents: समाजात आजही अनेक जुन्या परंपरा आणि विचार घट्ट रुजलेले दिसतात. त्यातीलच एक विचार म्हणजे ‘लग्नानंतर मुलगी ही परक्या घरची होते.’ अनेक ठिकाणी आजही मुलीला लग्नानंतर कितीही अडचणी आल्या तरी तिने सगळं सहन करावं, तडजोड करावी आणि कोणत्याही परिस्थितीत माहेरी परत येऊ नये, अशी मानसिकता पाहायला मिळते. काही वेळा हीच भीती मुलींना आयुष्यभर गप्प बसायला भाग पाडते.
दरम्यान, हुंडाबळी आणि वैवाहिक छळाच्या वाढत्या घटनांमुळे देशभरात चिंता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या आकडेवारीनुसार २०२४ मध्ये भारतात हजारो हुंडाबळीच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. अशा अनेक घटनांनंतर सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक पालक आणि मुली भावूक होताना दिसत आहेत.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक कुटुंब जेवणासाठी एकत्र बसलेलं दिसतं. आई, वडील आणि त्यांची मुलगी शांतपणे जेवत असतात. घरातील वातावरण अगदी साधं आणि प्रेमळ वाटत असतानाच मुलगी अचानक असा प्रश्न विचारते की काही क्षणांसाठी आई-वडीलही शांत होतात.
ती आपल्या आई-वडिलांना विचारते, ‘लग्नानंतर जर माझं सासरी नाही पटलं… जर मला तिथे खूप त्रास झाला… तर मी परत घरी येऊ शकते का?’
हा प्रश्न ऐकताच वातावरणात एक वेगळीच शांतता पसरते. कारण हा फक्त एका मुलीचा प्रश्न नसतो, तर हजारो मुलींच्या मनात दडलेली भीती असते. समाज काय म्हणेल? लोक टोमणे मारतील का? आई-वडिलांना लोकांसमोर मान खाली घालावी लागेल का? या सगळ्या विचारांनी अनेक मुली स्वतःचं दुःख मनातच दाबून ठेवतात.
विशेष म्हणजे, या व्हिडीओमधील मुलगीही आई-वडिलांना हाच प्रश्न विचारताना दिसते. ‘लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतील… माझ्यामुळे तुम्हाला त्रास होईल… तरीही तुम्ही मला स्वीकाराल का?’ असा तिचा भावनिक प्रश्न अनेकांच्या मनाला भिडला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होण्यामागेही हेच कारण सांगितलं जात आहे. कारण प्रत्येक मुलीच्या मनात कधीतरी हा प्रश्न नक्कीच येतो. लग्न करताना प्रत्येक आई-वडील आपल्या मुलीसाठी उत्तम घर, चांगलं कुटुंब आणि आनंदी आयुष्य शोधण्याचा प्रयत्न करतात. मात्र, आयुष्यात पुढे काय घडेल हे कुणालाच माहिती नसतं. काही वेळा परिस्थिती पूर्णपणे बदलते आणि मुली मानसिकदृष्ट्या खचून जातात.
अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, प्रत्येक पालकांनी हा व्हिडीओ पाहायला हवा, कारण मुलीचं लग्न झालं म्हणजे तिचं माहेर संपत नाही. उलट तिला सर्वात जास्त आधाराची गरज असते ती तिच्या आई-वडिलांचीच.
व्हिडीओच्या शेवटी मुलीच्या प्रश्नावर तिच्या आई-वडिलांनी दिलेलं उत्तर ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. तिचे वडील शांतपणे म्हणाले, ‘हे घर तुझं आहे आणि कायम तुझंच राहील. तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू निर्धास्तपणे परत येऊ शकतेस. जग काय म्हणेल याचा विचार करू नकोस… आधी तू महत्त्वाची आहेस.’
हा संवाद ऐकल्यानंतर सोशल मीडियावर अनेक जण भावूक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काहींनी ‘प्रत्येक मुलीला असे आई-वडील मिळायला हवेत’ असं म्हटलं आहे, तर काहींनी ‘मुलीला आधार देणं हीच खरी पालकांची ताकद आहे’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
