Viral Video : आई-बाबा मुलांना खूप कष्ट करून वाढवतात, त्यांना चांगले संस्कार देतात, आपल्या मुलांच्या यशस्वी जीवनासाठी दिवसरात्र मेहनत घेतात आणि मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःची सुख-दुःख बाजूला ठेवतात. तर या सगळ्या गोष्टींची अनेक मुलांना जाणीव असते आणि ते आई-बाबांचे कष्ट पाहून त्यांना प्रत्येक सुख देण्याच्या प्रयत्नात असतात. कामाला लागल्यावर पहिला पगार आई-बाबांच्या हातात देतात किंवा त्यांनी कधी न अनुभवलेल्या गोष्टी त्यांच्यासाठी करताना दिसून येतात; तर आज सोशल मीडियावरसुद्धा असंच काहीसं पहायला मिळालं आहे. तरुणी प्रवासादरम्यान आई-बाबांसाठी अगदी शेवटच्या क्षणी इकॉनॉमिक क्लासचे तिकीट बिझनेस क्लासमध्ये बदलून घेते आणि त्यांना खास सरप्राईज देते.
विमानतळावर आई-बाबांची लेक बिझनेस क्लासचे तिकीट काढते. आई-बाबा विमानतळावर इकॉनॉमी क्लासच्या रांगेत उभे असतात. अशातच तरुणी त्यांच्या हातात तिकिटे देते आणि त्यांना तिकिटावर कोणता क्लास लिहिला आहे वाचायला सांगते. बिझनेस क्लासचे तिकीट आहे हे पाहून आई आणि बाबांचे हावभाव क्षणात बदलतात आणि बाबा लगेच म्हणतात, ‘आयुष्यात पहिल्यांदा मी बिझनेस क्लासने प्रवास करणार आहे, या तिकिटांना फ्रेम करून ठेवूयात’ असे बाबा आपल्या बायकोला आणि लेकीला सांगताना दिसत आहेत.तसेच या दरम्यान बाबा पाच ते सहावेळा तिकीटाकडे बघतात. लेकीने बिझनेस क्लासचे तिकीट दाखवताच आई-बाबांनी कशी प्रतिक्रिया दिली एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…




व्हिडीओ नक्की बघा :
आई-बाबांसाठी काढले बिझनेस क्लासचे तिकीट :
विमानात बिझनेस क्लास, इकॉनॉमी क्लास अशी दोन तिकिटे मिळतात. इकॉनॉमी क्लासचे तिकीट फार कमी असते. पण, बिझनेस क्लासची तिकिटे बुक करणे अनेकांसाठी सोपे नसते. पण, एका तरुणीने हे करून दाखवलं आहे. तरुणी तिच्या आई-बाबांना विमानातून प्रवास करण्यासाठी घेऊन जाते. तसेच प्रवासादरम्यान अगदी शेवटच्या क्षणी इकॉनॉमिक क्लासचे तिकीट बिझनेस क्लासमध्ये बदलून घेते आणि आई-बाबांचा आनंद गगनात मावत नाही.
अनेक तरुण मंडळी आई-बाबांच्या चेहऱ्यावर आनंद बघण्यासाठी, त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत असतात. तर या व्हिडीओतसुद्धा असंच काहीसं पहायला मिळालं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ishpreetkay या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. इशप्रीत कौर असे या युजरचे नाव आहे. तसेच हा व्हिडीओ शेअर करून तिने आई-बाबांबद्दलच्या आणि या खास क्षणाच्या भावना कॅप्शनमध्ये मांडल्या आहेत. व्हिडीओ पाहून अनेकजण तरुणीची प्रशंसा करत आहेत. तसेच आई-बाबांची प्रतिक्रिया पाहून अनेकजण भावुक झाले आहेत.