राज्यातील विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी आज म्हणजेच २० जून रोजी मतदान सुरु आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर लिलावती रुग्णालयामध्ये आज शस्त्रक्रिया पार पडणार आहे. राज ठाकरेंच्या पायावर आज शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज विधानपरिषदेच्या मतदान आणि निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राज ठाकरेंच्या प्रकृती स्वास्थासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. पुणे, बीडसहीत राज्याच्या वेगवगेळ्या भागांमध्ये राज ठाकरेंच्या प्रकृतीसाठी आणि आरोग्यासाठी मनसैनिकांकडून प्रार्थना केली जात असतानाच शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनीही राज ठाकरेंना लवकर बरं व्हा असं म्हणत शुभेच्छा दिल्यात. मात्र दिपाली सय्यद यांनी शुभेच्छा देतानाही त्याला राजकीय झालर चढवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगाविरोधी भूमिका घेतल्यापासून वेळोवेळी दिपाली सय्यद यांनी मनसेविरुद्ध भूमिका घेतली आहे. तसेच त्यांनी अनेकदा भाजपाचे वरिष्ठ नेते, त्यामध्ये अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते देवेंद्र फडणवीसांपर्यंत अनेकांवर टीका केली आहे. प्रसारमाध्यमांवरील चर्चासत्रं असोत किंवा सोशल मीडियावरील अकाऊंट्स असोत दिपाली सय्यद या मागील काही काळापासून त्यांच्या वक्तव्यांमुळे विशेष चर्चेत राहिलेल्या आहेत. असेच एक वक्तव्य आता त्यांनी राज ठाकरेंची नियोजित शस्त्रक्रिया आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीची सांगड घालत केलंय.

दिपाली सय्यद यांनी विधान परिषद निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस एकटेच पडू नयेत म्हणून राज ठाकरेंनी लवकर बरं व्हावं असं म्हटलंय. “माननीय राजसाहेब आपण लवकरात लवकर बरे व्हा, नाहीतर विधानपरिषद निवडणुकीनंतर फडणवीस साहेब एकटे पडतील,” असं दिपाली यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. पुढे बोलताना त्यांनी, “भोंगा अजून अर्धवट आहे,” असंही म्हटलंय.

दिपाली यांनी या ट्विटमध्ये स्वत:च्या पक्षासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र भाजपाचं ट्विटर हॅण्डलही टॅग केलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepali sayed wish raj thackeray to get well soon so that he can support devendra fadnavis after mlc election scsg
First published on: 20-06-2022 at 12:43 IST