परदेशातून अमली पदार्थ आणि सोन्याची तस्करी करुन देशात आणण्याचे प्रयत्न विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा आणि सतर्क अधिकाऱ्यांमुळे हाणून पाडले जातात. अनेकदा विमानतळावर अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याच्या किंवा सोन्याचे दागिने लपून आणण्याच्या प्रयत्नात परदेशी तसेच भारतीय प्रवाशांना ताब्यात घेतल्याच्या बातम्या वाचनात येतात. मात्र दिल्ली विमानतळावर तब्बल २८ कोटींच्या घड्याळांची तस्करी करताना एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील माहिती दिली आहे. दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई करण्यात आली आहे. हातावर बांधण्याची महागडी घड्याळं बेकायदेशीररित्या भारतात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका प्रवाशाला ताब्यात घेतलं आहे. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रवाशाला महागड्या घड्याळांची तस्करी करताना रंगेहाथ पकडलं. एकूण सात घड्याळं ताब्यात घेण्यात आली असून यापैकी एका घड्याळाची किंमत ही २७ कोटी ९ लाखांहून अधिक आहे.

एएनआयने दिलेल्या फोटोंमध्ये दोन घड्याळं दिसत आहेत. यापैकी एका घड्याळ हे ‘जॅकोब अॅण्ड कंपनी’चं आहे. बीएल ११५.३० असं या घड्याळाच्या मॉडेलचं नाव आहे. या घड्याळाची किंमत २७ कोटी ९ लाख २६ हजार ५१ रुपये इतकी आहे.

तर दुसरं घड्याळ हे ‘रोलेक्स’ या कंपनीचं आहे. या घड्याळाची किंमत ही १५ लाख ५९ हजार ३५८ रुपये इतकी आहे.

मागील काही दिवसांमध्ये मुंबई विमानतळावरही अमली पदार्थांच्या तस्करीची दोन मोठी प्रकरणं समोर आली आहेत.