H1N1 Influenza Symptoms Prevention Tips : दिल्लीत सध्या H1N1 (इन्फ्लुएन्झा A) व्हायरसच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेयत. ताज्या अहवालानुसार, ६ ऑगस्ट २०२६ पर्यंत दिल्लीत H1N1 (स्वाइन फ्लू)चे १,३४९ बाधित रुग्ण आढळले आहेत. दिल्लीचे आरोग्यमंत्री पंकज सिंग यांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे.

अहवालानुसार, दिल्लीतील काही रुग्णालयांमध्ये H1N1 च्या रुग्णांची संख्या वाढली आहे. काही रुग्णांमध्ये संसर्ग इतका गंभीर आढळला की, त्यांना ICU (अतिदक्षता विभाग)मध्ये दाखल करावे लागले. गंभीर फ्लू संसर्गामुळे फुप्फुसांवर परिणाम होऊन श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

यावर दिल्लीतील संत परमानंद रुग्णालयातील फुप्फुस, जुनाट आजार आणि झोपेच्या विकारांचे तज्ज्ञ डॉ. दीपांश गुप्ता यांनी जनसत्ताशी बोलताना सांगितले की, सामान्य सर्दी-खोकला झाल्यास नाक गळणे- बंद होणे, घसा खवखवणे अशी लक्षणं दिसतात. पण H1N1 इन्फ्लुएन्झामध्ये तीव्र ताप, थंडी वाजणे, डोकेदुखी आणि अंगदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. थकवा आणि अशक्तपणा खूप जास्त असू शकतो. काही वेळा रुग्ण इतका अशक्त होतो की त्याला उभं राहणंही कठीण जातं.” चला, तज्ज्ञांकडून समजून घेऊया की सामान्य व्हायरल संसर्ग आणि H1N1 इन्फ्लुएन्झाच्या लक्षणांमधील फरक कसा ओळखावा.

delhi h1n1 virus update
दिल्ली एच१एन१ व्हायरल (फोटो – google trends)

सामान्य व्हायरल संसर्ग आणि H1N1 इन्फ्लुएन्झामधील फरक

सामान्य व्हायरल संसर्ग आणि H1N1 इन्फ्लुएन्झा या दोन्हीमध्ये सर्दी, खोकला आणि घशात खवखव यांसारखी लक्षणे असू शकतात, त्यामुळे सुरुवातीला या दोघांमधील फरक ओळखणे कठीण जाते. पण, H1N1 फ्लूची लक्षणे अचानक आणि अतिशय तीव्रतेने सुरू होतात.

डॉ. दीपांश गुप्ता यांनी सांगितले की, H1N1 संसर्गात खोकला, घशात खवखव आणि नाक बंद होणं ही लक्षणंदेखील दिसून येतात. सामान्य सर्दीच्या तुलनेत इन्फ्लुएन्झाची लक्षणं अधिक तीव्र असतात. विशेषतः तीव्र ताप आणि प्रचंड अंगदुखी यांमुळे हा आजार सामान्य सर्दी-खोकल्यापेक्षा वेगळा ओळखता येतो.

लहान मुलांमधील H1N1 ची लक्षणे

H1N1 किंवा इन्फ्लुएन्झाने बाधित लहान मुलांमध्ये श्वसनाच्या त्रासाव्यतिरिक्त पोटाशी संबंधित (गॅस्ट्रोइंटेस्टाइनल) समस्याही उद्भवू शकतात. यामध्ये मळमळ, उलट्या आणि जुलाब यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे, त्यामुळे मुलांमध्ये केवळ सर्दी-खोकला पाहून त्याला सामान्य संसर्ग मानणे योग्य नाही, अशी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

किती दिवस ताप राहिल्यास सावध व्हावे?

जर ताप दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त काळ राहत असेल, तीव्र तापासोबत डोकेदुखी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर याकडे सामान्य सर्दी म्हणून दुर्लक्ष करू नये. ताप सतत वाढत असल्यास किंवा छातीत कफ/जडपणा जाणवत असल्यास, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास दुर्लक्ष करू नका, अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सामान्य सर्दी-खोकल्यामध्ये श्वास घेण्यास गंभीर त्रास होत नाही. मात्र, H1N1 बाधित रुग्णाला श्वास घेण्यास अडचण येऊ शकते. ताप येण्यासह श्वास घेण्याचा वेग वाढणे, श्वास घेण्यास कठीण जाणे किंवा छाती ताणली जाणे हे गंभीर संसर्गाचे संकेत असू शकतात

H1N1 मुळे न्यूमोनियाचा धोका

H1N1 संसर्ग काही प्रकरणांमध्ये गंभीर रूप धारण करू शकतो आणि त्यामुळे न्यूमोनियासारखी गुंतागुंत निर्माण होऊ शकते. याव्यतिरिक्त दुय्यम जीवाणू संसर्गाचा (Secondary Bacterial Infection) धोकाही असतो, म्हणूनच श्वासोच्छवासाचा त्रास किंवा ऑक्सिजनची पातळी कमी होणं या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

H1N1 ची लक्षणं किती दिवसांत दिसतात?

H1N1 व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर साधारणपणे दोन ते तीन दिवसांत लक्षणे दिसून येतात. संसर्गातून पूर्णपणे बरे होण्यासाठी व्यक्तीच्या प्रतिकारशक्तीनुसार तीन ते पाच दिवस किंवा अधिक वेळ लागू शकतो.

H1N1 ची तपासणी करण्यासाठी कोणती चाचणी केली जाते?

H1N1 किंवा इन्फ्लुएन्झाचे निदान करण्यासाठी RT-PCR आधारित चाचणी केली जाते. यासाठी नाक किंवा घशातील द्रवाचा (Throat/Nasal Swab) नमुना घेतला जातो.

H1N1 वर उपचार कसे केले जातात?

डॉक्टर रुग्णाच्या स्थितीनुसार अँटीव्हायरल (Antiviral) औषधे देतात. तज्ज्ञांनी ऑसेल्टामिव्हिर (Oseltamivir – Tamiflu) या औषधाचा उल्लेख केला आहे. औषधाचा डोस रुग्णाचे वय आणि स्थितीनुसार डॉक्टर ठरवतात. व्हायरल संसर्गावर अँटीबायोटिक्स उपयुक्त नसतात, मात्र दुय्यम जीवाणू संसर्ग झाल्यास डॉक्टर स्वतंत्रपणे अँटीबायोटिक्स देऊ शकतात.

कोणाला H1N1 चा जास्त धोका आहे?

लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, तसेच दमा (Asthma), COPD, हृदयविकार, मधुमेह (Diabetes) आणि लठ्ठपणा असणाऱ्या व्यक्तींना H1N1 चा धोका अधिक असतो. H1N1 पासून बचाव कसा करावा? गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा, हात वारंवार स्वच्छ धुवा, बाधित व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवा, भरपूर पाणी प्या आणि विश्रांती घ्या; स्वतःच्या मनाने औषधे न घेता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डॉक्टरांकडे कधी जावे? (रेड फ्लॅग लक्षणे)

सतत येणारा तीव्र ताप, श्वास घेण्यास त्रास, ऑक्सिजनची पातळी कमी होणे, छातीत वेदना किंवा जडपणा आणि अत्यंत अशक्तपणा ही रेड फ्लॅग (धोक्याची) लक्षणे आहेत; अशी लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.