scorecardresearch

“काश्मिरी असणं गुन्हा आहे का?”, ओळखपत्र असूनही हॉटेलचा काश्मिरी तरुणाला रुम देण्यास नकार, व्हिडीओ व्हायरल

काश्मिरींना खोली न देण्याचे पोलिसांनी आदेश दिल्याचं तरुणाला सांगण्यात आलं. त्यानंतर पोलिसांना ट्वीट करून त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागली.

(फोटो सोर्स: ट्विटर/@NasirKhuehami)।

दिल्लीतील एका हॉटेलमध्ये एका काश्मिरी तरुणाला खोली न दिल्याचं प्रकरण समोर आलंय. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, तो तरुण काश्मीरचे आधार कार्ड, पासपोर्ट दाखवण्याबद्दल बोलतो परंतु रिसेप्शनसिस्ट त्याला खोली देण्यास नकार देताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये, हॉटेलच्या रिसेप्शनवर बसलेली एका महिला कर्मचारी तरुणाला आधार कार्डाव्यतिरिक्त वैध ओळखपत्र दाखवण्यास सांगत आहे. तो आधारकार्ड आणि पासपोर्ट असल्याचं सांगतो. परंतु, तरीही या तरुणाला खोली मिळत नाही. जम्मू-काश्मीरचा आयडी इथे चालणार नाही, असे त्याला सांगण्यात आले. दरम्यान, या तरुणाने आधीच ओयो वेबसाइटद्वारे हॉटेलमध्ये एक खोली बुक केली होती. परंतु त्याला ती रुम देण्यात आली नाही.

जेव्हा त्या तरुणाने त्याला खोली का दिली जात नाही, असे विचारले तेव्हा हॉटेलने उत्तर दिले की दिल्ली पोलिसांनी काश्मिरी नागरिकांना हॉटेलमध्ये खोली न देण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, ही अफवा असून पोलिसांनी अशा कोणत्याही सूचना दिल्या नसल्याचं दिल्ली पोलिसांनी ट्वीट करून म्हटलंय.

जम्मू आणि काश्मीर स्टुडंट्स युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते नासिर खुहमी यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “कश्मीर फाइल्स या चित्रपटाचा सामान्य स्तरावर हा प्रभाव होत आहे. ओळखपत्र आणि इतर कागदपत्रे असूनही दिल्लीच्या हॉटेलने काश्मिरी व्यक्तीला खोली नाकारली. काश्मिरी असणे हा गुन्हा आहे का?”

तर दुसरीकडे सोशल मीडियावर लोकांनी कमेंट्स करत हा द काश्मीर फाईल्स चित्रपटाचा प्रभाव असल्याचं म्हटलंय.  दरम्यान, या व्यक्तीबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तो श्रीनगरचा रहिवासी आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी त्याची ओळख सय्यद अशी केली आहे. सय्यदने हॉटेलची खोली ऑनलाइन बुक केली होती. ही घटना २२ मार्चची असल्याचं म्हटलं जातंय. व्हिडीओ व्हायरल हे प्रकरण वाढलं, त्यामुळे ओयोने त्या हॉटेलला यादीतून काढून टाकले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Delhi hotel refused to give room to kashmiri boy video viral hrc

ताज्या बातम्या