First Date Scam Goes Viral: प्रेमाची पहिली भेट प्रत्येकाच्या आयुष्यात खास असते. काही जणांसाठी ती गोड आठवण बनते, तर काहींसाठी आयुष्यभर विसरता न येणारा धडा ठरते. दिल्लीतील एका २३ वर्षीय तरुणासोबतही असंच काहीसं घडलं. डेटिंग अॅपवर झालेली पहिली ओळख, पहिल्याच दिवशी ठरलेली भेट आणि त्यानंतर घडलेला प्रकार पाहून तोच नव्हे, तर सोशल मीडियावरील लाखो लोकही थक्क झाले आहेत.

या तरुणाने आपला अनुभव रेडिटवर शेअर केला असून, त्याची पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली; तर काहींनी हा प्रकार पूर्वनियोजित फसवणुकीचा भाग असल्याचा दावा केला आहे.

तरुणाच्या म्हणण्यानुसार, त्याची ओळख एका डेटिंग अॅपवर एका तरुणीशी झाली होती. दोघांमध्ये थोडासा संवाद झाल्यानंतर त्याच दिवशी भेटण्याचा निर्णय घेण्यात आला. आयुष्यातील ही त्याची पहिलीच डेट असल्यानं तो प्रचंड उत्सुक होता. त्यानं पोस्टमध्ये नमूद केलं आहे की, यापूर्वी तो कधीच कोणत्याही प्रेमसंबंधात नव्हता आणि मुलींशी त्याचा फारसा संपर्कही आला नव्हता. त्यामुळे ही भेट त्याच्यासाठी अत्यंत खास होती.

ठरल्याप्रमाणे तो मेट्रो स्थानकावर पोहोचला. तेथून संबंधित तरुणी त्याला घेऊन गेली. मात्र, त्याच्या अपेक्षेप्रमाणे एखाद्या शांत कॅफेमध्ये जाण्याऐवजी ती त्याला थेट एका पबमध्ये घेऊन गेली. सुरुवातीला त्यानं त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. पण पुढे जे घडलं, त्याची त्याला अजिबात कल्पना नव्हती.

पोस्टनुसार, त्या तरुणीनं एकामागोमाग एक महागड्या वस्तूंची ऑर्डर देण्यास सुरुवात केली. सुमारे १३ हजार रुपयांच्या शॅम्पेनच्या बाटल्या, जवळपास सहा हजार रुपयांचे दोन हुक्का आणि त्यासोबत विविध खाद्यपदार्थांची ऑर्डर देण्यात आली. बिलाची रक्कम सतत वाढत होती. मात्र, पहिली भेट असल्यानं आणि समोरच्याला दुखावू नये या विचारानं तो शांत राहिला.

रात्री अखेर बिल टेबलवर आलं आणि त्यावरील आकडा पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तब्बल २० हजार ५०० रुपयांचं बिल त्याच्यासमोर होतं. विशेष म्हणजे ही रक्कम त्याच्या एका महिन्याच्या पगाराच्या जवळपास निम्मी होती.

या घटनेतील आणखी एक गोष्ट त्याला अधिक खटकली. त्याच्या म्हणण्यानुसार, बिल आल्यानंतर ती तरुणी स्वच्छतागृहात गेली. तिनं बिल किती झालं, ते वाटून घेऊया का किंवा काही मदत करू का, असा साधा प्रश्नही विचारला नाही. मात्र, तिचा हेतू तसाच होता, असा थेट आरोप करण्याचं टाळत असल्याचंही त्यानं स्पष्ट केलं आहे.

त्यानं पोस्टमध्ये लिहिलं आहे की, पैशांपेक्षा या अनुभवानं तो अधिक दुखावला गेला. स्वतःला जुन्या विचारांचा प्रेमावर विश्वास ठेवणारा व्यक्ती म्हणवत त्यानं सांगितलं की, पहिल्या भेटीत त्याला महागडं हॉटेल किंवा मोठा खर्च नको होता. शांत वातावरणात गप्पा, एकत्र फेरफटका आणि समोरच्या व्यक्तीला मनापासून जाणून घेण्याची त्याची इच्छा होती; मात्र प्रत्यक्षात सर्व काही अगदी उलट घडलं होतं.

ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक रेडिट वापरकर्त्यांनी त्याला हा प्रकार फसवणुकीचाच असल्याचं सांगितलं. दिल्लीमध्ये अशा प्रकारच्या डेटिंग फसवणुकीच्या घटना वारंवार घडत असल्याचा दावा अनेकांनी केला. काहींनी त्याला अत्यंत निष्पाप असल्याचं म्हटलं; तर काहींनी पहिल्याच भेटीत महागड्या ठिकाणी जाण्यापूर्वी सावध राहण्याचा सल्ला दिला.

या घटनेनंतर सोशल मीडियावर पहिल्या भेटीतील शिष्टाचार, बिल कोण भरावं, खर्चाबाबत आधीच स्पष्ट चर्चा व्हावी का, तसेच डेटिंग अॅपवर अनोळखी व्यक्तींना भेटताना कोणती काळजी घ्यावी, यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.

My first date cost me ₹20.5k. I still don't know how to feel about it.
byu/Big_Cauliflower_7127 indelhi

ही घटना खरी असेल किंवा नसेल; मात्र एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. ऑनलाइन ओळख झाल्यानंतर पहिल्याच भेटीत भावनांपेक्षा सावधगिरी अधिक महत्त्वाची ठरते. कारण- एका चुकीच्या निर्णयाची किंमत कधी कधी हजारो रुपयांतच नव्हे, तर आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या मोठ्या फटक्याच्या अनुभवाच्या स्वरूपातही मोजावी लागू शकते.