उड्डाणपुलाच्या खांबावर शुशोभिकरणासाठी लावलेल्या व्हर्टीकल गार्डनमधील कुंड्या चोरताना एक व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ दिल्लीमधील असल्याची माहिती समोर आली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कुंड्या चोऱ्याना व्यक्तीवर टीका केली आहे.

फेसबुकवरील ‘ऑलवेज दिल से’ या पेजवरुन पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये एक मध्यमवयीन व्यक्ती व्हर्टीकल गार्डनमधील कुंड्या चोरताना दिसत आहे. आपली चोरी मोबाइल कॅमेरामध्ये कैद होत असल्याचे दिसताच ही व्यक्ती कुंडीमधील रोपटे आणि माती खाली टाकून देत कुंडी पिशवीत घालून पळ काढताना या व्हिडिओत दिसते. ‘हे काका सर्व रोपटी उद्धवस्त करुन प्लॅस्टीकच्या कुंड्या चोरत आहेत,’ अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. ‘सामान्य नागरिकच असं वागणार असेल तर सरकारला दोष देऊन फायदा नाही. मी या व्यक्तीला चांगलाच धडा शिकवला असता पण त्यांचे वय बघून मी त्यांना जाऊ दिले,’ असंही व्हिडिओ पोस्ट करणाऱ्याने म्हटलं आहे.

हा व्हिडिओ दहा ऑक्टोबरला पोस्ट करण्यात आला आहे. त्यानंतर अनेक पेजेसवरुन आणि ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. अशा लोकांवर प्रशासनाने कठोर कारवाई करायला हवी असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, देशभरातील अनेक बड्या शहरांमध्ये उड्डाणपुलाखालील खांबांवर व्हर्टीकल गार्डन उभारण्यात येतात. शहरामधील प्रदुषणावर आळा घालण्यासाठी या व्हर्टीकल गार्डनचा उपयोग होतो.