सध्या सोशल मीडियाच्या युगात व्हायरल होण्याची स्पर्धा इतकी वाढली आहे की अनेकदा लोक प्रसिद्धीच्या नादात सार्वजनिक ठिकाणी कस वागावे आणि कस नाही हे विसरताना दिसतात. रील्स, शॉर्ट व्हिडीओ आणि व्ह्युज मिळवण्याच्या धडपडीत काही जण स्वतःकडे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट किंवा विचित्र कृत्ये करताना दिसतात. यामुळे केवळ सोशल मीडियावर चर्चा रंगत नाही, तर सार्वजनिक शिस्त, सुरक्षितता आणि सिविक सेन्स यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागतात.

विशेष म्हणजे रेल्वेस्थानक, मेट्रो, रस्ते किंवा गर्दीची ठिकाणे यांसारख्या सार्वजनिक जागांमध्ये अशा प्रकारचे वर्तन इतरांसाठी त्रासदायक किंवा धोकादायक ठरू शकते. अलीकडील एका व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा एकदा हाच मुद्दा चर्चेत आला असून, सोशल मीडियावर लोकांनी यावर विविध प्रतिक्रिया देत सार्वजनिक ठिकाणी अस वर्तनावर चर्चा सुरू केली आहे.

दिल्लीतील एका मेट्रो स्टेशनवरील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडीओमध्ये एक युवक गर्दीच्या प्लॅटफॉर्मवर विचित्र पद्धतीने डान्स करताना दिसतो. त्याचा डान्स पाहून आजूबाजूचे प्रवासी बाजूला सरकताना आणि आश्चर्याने त्याच्याकडे पाहताना दिसतात. परिस्थिती अधिक धोकादायक तेव्हा होते, जेव्हा तो वेगाने येणाऱ्या मेट्रोच्या अगदी जवळ जाऊन डान्स करू लागतो.

या प्रकारामुळे काही प्रवासी घाबरल्याचेही दिसून येते. हा व्हिडीओ ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @desimojito या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, काही युजर्सच्या म्हणण्यानुसार हा प्रकार कीर्ती नगर मेट्रो स्टेशनवर घडल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे वर्तन कितपत योग्य आहे, यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.

पाहा व्हिडीओ

या व्हिडीओवर सोशल मीडियावर समिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेक युजर्सनी सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या वर्तनावर नाराजी व्यक्त करत याला ‘रील्ससाठीची अतिरेकी धडपड’ असे म्हटले आहे. काहींनी अशा कृतीमुळे इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, असे मत व्यक्त केले; तर काही युजर्सनी संबंधित व्यक्तीच्या मानसिक स्थितीबाबतही प्रश्न उपस्थित केले.

एका युजरने कमेंट करत लिहिले की, फक्त व्ह्युज मिळवण्यासाठी अशा प्रकारे वागणे लाजिरवाणे आहे, तर दुसऱ्याने म्हटले की लोक आता प्रसिद्धीसाठी कोणत्याही थराला जात आहेत. काहींनी मात्र समाजातील बदलत्या ट्रेंडकडे लक्ष वेधत सांगितले की, आजकाल लोक इतके ‘प्रँक’ आणि रील्समध्ये गुंतले आहेत की खऱ्या मदतीची गरज असलेली व्यक्ती दिसली तरी लोक त्याकडे संशयाने पाहतील. या संपूर्ण घटनेमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या प्रभावाबरोबरच सार्वजनिक ठिकाणी जबाबदारीने वागण्याची गरज अधोरेखित झाली आहे.