Delivery Boy Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही व्हिडीओ फक्त मनोरंजन करत नाहीत, तर समाजातील खरी परिस्थिती दाखवतात. असे व्हिडीओ पाहिल्यावर आपण किती संवेदनशील आहोत, माणुसकी किती उरली आहे आणि आधुनिक सोईंमुळे आपले विचार किती बदलले आहेत, याचा विचार करायला भाग पाडतात. विशेषतः शहरांमध्ये राहणाऱ्या सुशिक्षित आणि सभ्य समजल्या जाणाऱ्या लोकांचे वागणे अनेकदा धक्कादायक असते. फक्त पैसा किंवा सुविधा असणे म्हणजे माणूस मोठा होतो, असे नाही; तर त्याच्या वागणुकीतूनच मनाचा मोठेपणा दिसून येतो. असाच एक व्हिडीओ अलीकडे व्हायरल झाला असून, यावरून युजर्सनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना प्रश्न पडतोय की आपण खरंच पुढे जात आहोत की हळूहळू माणुसकीच गमावत आहोत?

या व्हिडीओमध्ये एक डिलिव्हरी बॉय दिसतो, जो पाठीवर मोठे आणि जड पार्सल घेऊन सोसायटीच्या जिन्यावरून सहाव्या मजल्यापर्यंत चढत जाताना दिसतो. त्याला सोसायटीच्या लिफ्टचा वापर करण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे कोणतीही तक्रार न करता, आपले काम पूर्ण करण्यासाठी तो जिन्यांद्वारे ते जड पार्सल घेऊन जातो. व्हिडीओच्या एका भागात पार्सलच्या वजनामुळे त्याचा तोल जातानाही दिसतो; पण तरीही तो हार मानत नाही. अखेर तो पार्सल सुरक्षितपणे मालकाच्या घरापर्यंत पोहोचवतो.

विशेष म्हणजे इतके कष्ट करून पार्सल आणणाऱ्या डिलिव्हरी बॉयला मदत करण्याऐवजी घरातील व्यक्ती फक्त “आरामात या”, असे म्हणत असल्याचे व्हिडीओमध्ये ऐकू येते. हे दृश्य पाहून लोकांना खूप वाईट आणि अस्वस्थ वाटत आहे. लिफ्टसारखी साधी आणि आवश्यक सुविधा न देता, माणसाला ओझ्यासारखं वापरलं जातंय, ही गोष्ट लोकांना जास्तच चिडवणारी आणि संतापजनक वाटते.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ एक्सवर @NewsAlgebraIND या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया आल्या. अनेक युजर्सनी या घटनेला गुलामगिरी असल्याचे म्हटले. एका युजरने स्पष्टपणे लिहिले, “जर लिफ्ट वापरण्याची परवानगी नसेल, तर डिलिव्हरी एजंटने पार्सल गेटवर किंवा सिक्युरिटी गार्डकडे देऊन जावे.

त्यानंतर ते घरमालकाची जबाबदारी असावी.” दुसऱ्या युजरने सोसायटीतील लोकांच्या मानसिकतेवर टीका करत, “बाहेरून श्रीमंत दिसणारे अनेक लोक आतून स्वार्थी असतात,” अशी प्रतिक्रिया दिली. काहींनी तर हा प्रकार गरीब आणि कष्टकरी लोकांच्या यशाचे उदाहरण असल्याचे सांगितले. एका युजरने संतप्त लिहिले की, “पैसे आले की, माणूस गरीब माणसालाही प्राण्यासारखे वागवतो.” तर आणखी एका प्रतिक्रियेत लिफ्टच्या नियमांवर प्रश्न उपस्थित करीत, “लिफ्टमध्ये पाळीव प्राण्यांना परवानगी असते; पण माणसांना नाही, ही किती मोठी संतापाची गोष्ट आहे,” असे म्हटले.