महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोकठोक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. राजकीय मंचावरुन केलेल्या भाषणांमधील वक्तव्य असो किंवा सहज अगदी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना केलेलं वक्तव्य असो अजित पवार यांच्या सहज शाब्दिक टपली मारुन जाण्याच्या शैलीचा अनेकदा प्रत्यय येतो. असाच एक प्रकार शुक्रवारी पुण्यामध्ये घडला. पवारांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे साप्ताहिक आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली. बैठक सुरु होण्याआधी अजित पवारांना त्यांच्या एका हितचिंतकाकडून एक पुष्पगुच्छ पाठवण्यात आला. मात्र आपल्या खास शैलीत भाष्य करत अजित पवारांनी हा पुष्पगुच्छ नाकारला.

अजित पवारांच्या अध्यक्षतेखालील बैठक सुरु होण्याआधी विधानभवन परिसरामध्ये ऑक्सिजन सिलेंडर, करोना बाधित रुग्णाच्या सेवेसाठी चार चाकी वाहनांचा लोकार्पण कार्यक्रम अगदी मोजक्या लोकांमध्ये पार पडला. मात्र अजित पवारांना भेटण्यासाठी यावेळी त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्याच गर्दीतून एकाने “दादा तुम्हाला पुष्पगुच्छ द्यायचा आहे,” असं म्हणत पुष्पगुच्छ पुढे केला. मात्र अजित पवारांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर हा पुष्पगुच्छ घेण्यास नकार दिला. “काय करतो आता… अरे, बाबा काहीतरी नियम पाळा. कोणाकडून हा गुच्छ आणला. त्याला करोना होता का नाही, काय माहिती नाही काय नाही, जर काळजी घ्या,” असं म्हणत फोटो पुरता त्या पुष्पगुच्छाला हात लावत लगेच तिथून काढता पाय घेतला.

लसीवरुनही दिली होती मजेशीर प्रतिक्रिया…

यापूर्वी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अशाचपद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या करोना आढवा बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांना एका पत्रकाराने तुम्ही लस घेतली का असा प्रश्न विचारला होता. त्यावर अजित पवारांनी आपल्या खास शैलीमध्ये उत्तर देताना, “होय रे बाबा, मी लस घेतली आहे. मला इतरांसारखा लस घेताना फोटो काढायचा नव्हता. अशी नौटंकी मला आवडत नाही,” असं म्हटलं. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. लसीसंदर्भात अजित पवारांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी अगदी मिश्कील शब्दामध्ये एक टोलाही लगावला. “इतरांनी फोटो टाकल्यानंतर अनेकांनी ती लस घेतली. मी जर लस घेताना फोटो काढला असता तर जे लस घेणारे आहेत त्यांनी पण लस घेतली नसती”, असं अजित पवार यांनी म्हणताच सर्वजण हसू लागले.