देशाबाहेर फिरायला गेल्यावर अनेकदा आपली संस्कृती, आपला पोशाख यामुळे लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधले जाते. पण, एखादी साधी सामान्य भारतीय महिला परदेशात अचानक सेलिब्रिटी बनली तर? अगदी चित्रपटातील प्रसंग वाटावा असा हा किस्सा खऱ्या आयुष्यात घडला आहे. एका भारतीय महिलेनी परदेशात केवळ आपल्या पारंपरिक वेशभूषेमुळे लोकांची मने जिंकली आणि रशियाच्या रस्त्यांवर अक्षरशः स्टार असल्याचे अनुभवले. तिच्या सुंदर चालण्यापासून ते तिच्या हास्यापर्यंत, लोक प्रत्येक गोष्टीने तिच्यावर फिदा झाले.
हा व्हिडीओ शुभम गौतमने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याची आई रशियामध्ये फिरताना दिसत आहे. पारंपरिक राजस्थानी पोशाख घातलेली त्यांची आई अचानक परदेशी लोकांचे लक्ष वेधून घेते आणि ती एखादी सेलिब्रिटी असल्यासारखे तिच्याशी वागतात. शुभमने मजेदार कॅप्शनसह लिहिले, “ती फक्त माझी आई नाही, तर ती रशियाची एक सेलिब्रिटीदेखील आहे!”
व्हिडीओमध्ये शुभमची आई एका सुंदर राजस्थानी पोशाखात दिसत आहे, ज्यामध्ये पारंपरिक पोशाखात दिसत आहे. ओढणी, बांगड्या, नथ आणि गोंडस हास्य. ती तिच्या नवऱ्याबरोबर रशियाच्या रस्त्यांवर आरामात फिरताना दिसत आहे. त्याचदरम्यान तिथले लोक थांबून तिच्याकडे पाहू लागतात.
काही जण तिच्याकडे येऊन सेल्फी मागतात, काही जण कौतुकाने हात जोडतात, तर काही जण आनंदाने हात हलवून तिचे स्वागत करतात. शुभमची आईदेखील लाजून हसते आणि त्या प्रत्येकासह फोटो काढते. तिच्या वागण्यातील साधेपणा, पोशाखातील भारतीय रंग आणि व्यक्तिमत्त्वातील सौंदर्य या सर्वांनी परदेशी लोक अक्षरशः फिदा झालेले जाणवतात.
पाहा व्हिडिओ
व्हिडीओ सोशल मीडियावर येताच जबरदस्त व्हायरल झाला. हजारो लोकांनी पुन्हा-पुन्हा पाहत प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊसच पडला आहे. एका युजरने लिहिलं “ही तर एकदम रॉयल दिसत आहे!” तर दुसऱ्याने लिहिल “यांना थेट इंडियन ॲम्बेसेडर बनवा!” तिसऱ्याने म्हटले “आई तर जगात कुठेही गेल्या तरी सेलिब्रिटीच असतात.” तर अनेकांनी “अगदी राणीसारखी दिसत आहेत… नजर हटत नाही,” “राजस्थानी असल्याचा अभिमान वाटतो!” असं म्हटलं.
अशा प्रेमळ प्रतिक्रिया भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान आणि गौरवाच्या भावनेने भरलेल्या दिसतात. एक साधी भारतीय महिला केवळ आपल्या परंपरेमुळे परदेशात सुपरस्टारसारखी चमकू शकते. रशियातील नागरिकांच्या उत्साहाने पुन्हा एकदा सिद्ध केले, भारतीय संस्कृती, विशेषत: महिलांची सौंदर्यपूर्ण पारंपरिक वेशभूषा, जगभरात आपल्या वेगळेपणाने लक्ष वेधून घेते.
