देव प्रभाकर सिंह तोमर यांची कहाणी ही अनेक चढ-उतारांनी भरलेली आहे. चंबळच्या ‘बागी’ कुटुंबाची पार्श्वभूमी, ‘आयआयटी’मधील शिक्षण, नेदरलँड्समधील चांगली नोकरी आणि त्यानंतर ‘यूपीएससी’साठी घेतलेला मोठा निर्णय असा त्यांचा प्रवास आहे. तीन वेळा अपयश आल्यानंतरही त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले आणि अखेर चौथ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. याबद्दल सविस्तर वृत्त टाइम्स नाऊने दिले आहे.
वडिलांनी चंबळ सोडलं अन् आयुष्याची दिशा बदलली
तोमर यांच्या कुटुंबाची पाळेमुळे चंबळमध्ये रुजलेली आहेत. त्यांचे आजोबा एकेकाळी चंबळमधील ‘बागी’ होते. परंतु कुटुंबाच्या भविष्यासाठी त्यांच्या वडिलांनी वेगळा मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला आणि चंबळ सोडून ग्वाल्हेरमध्ये स्थायिक होत नव्याने स्वतःचं आयुष्य उभं केलं.
तोमर यांचं बालपण चंबळमध्ये गेले नसले तरी त्यांच्या शैक्षणिक प्रवासात अनेक अडचणी आल्या. सहावीत सीबीएसई शाळेत प्रवेश घेतल्यानंतर नव्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी त्यांना अनेक बदल करावे लागले. मात्र, त्यांनी शिक्षणात सातत्य कायम ठेवलं. कोणत्याही कोचिंगशिवाय स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी ‘आयआयटी रोपड‘मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळवला.
‘फिलिप’मध्ये नोकरी, थेट नेदरलँड्स गाठलं
‘आयआयटी’मधील शिक्षणानंतर तोमर यांना परदेशात काम करण्याची संधी मिळाली. मात्र, त्यांना नेदरलँड्समधील ‘फिलिप’ या कंपनीमध्ये नोकरी कॅम्पस प्लेसमेंटमधून मिळाली नव्हती. स्वतःच्या गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी ही नोकरी मिळवली होती. त्यानंतर ते ॲमस्टरडॅमजवळील ‘फिलिप’च्या मुख्यालयात रुजू झाले. चांगली नोकरी, परदेशातील आयुष्य आणि करिअरची उत्तम संधी असूनही काही काळानंतर त्यांना आपल्या आयुष्याबाबत वेगळाच प्रश्न पडू लागला.
‘आपण जे आयुष्य जगत आहोत आणि आपल्याला खरंच काय करायचं आहे, यामध्ये काहीतरी फरक आहे’, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. याच काळात यूपीएससीचा विचार त्यांच्या मनात रुजला.
नोकरी सोडली, यूपीएससीची तयारी सुरू केली
यूपीएससीची तयारी करण्यासाठी त्यांनी परदेशातील नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. पहिल्याच प्रयत्नात त्यांना पूर्व परीक्षेत यश मिळाले नाही. ते कट-ऑफपेक्षा १२.५ गुणांनी मागे राहिले. दुसऱ्या प्रयत्नातही त्यांना अपयश आले. यावेळी त्यांची कामगिरी आणखी जवळची होती. ते फक्त २.५ गुणांनी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरू शकले नाहीत.
तिसऱ्या प्रयत्नात मुलाखतीपर्यंत मजल, तरीही अपयश
दोन अपयशांनंतर तोमर यांनी आपल्या अभ्यासाच्या पद्धतीचा पुन्हा विचार केला. केवळ माहिती जमा करण्याऐवजी यूपीएससीची तयारी रणनीती म्हणून करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. याचा परिणाम तिसऱ्या प्रयत्नात दिसून आला. यावेळी त्यांनी मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत मजल मारली. निकालाबाबत त्यांना यावेळी चांगला आत्मविश्वासही होता. निकाल जाहीर होण्यापूर्वी त्यांनी गावातून कुटुंबीयांनाही बोलावून घेतले होते. मात्र, तिसऱ्या प्रयत्नातही त्यांना अंतिम यश मिळालं नाही.
चौथ्या प्रयत्नात अखेर स्वप्न पूर्ण
तीन अपयशानंतरही तोमर यांनी हार मानली नाही. चौथ्या प्रयत्नात त्यांनी यूपीएससीची कठीण परीक्षा यशस्वीपणे पार केली. २०२३ मध्ये त्यांनी यूपीएससीमध्ये ‘ऑल इंडिया रँक’ ६२९ मिळवल्यानंतर त्यांची निवड भारतीय रेल्वे रहदारी सेवेसाठी झाली असून ते सध्या रेल्वे मंत्रालयात कार्यरत आहेत.
‘आयआयटी’ची पदवी, नेदरलँड्समधील नोकरी आणि त्यानंतर यूपीएससीसाठी घेतलेला निर्णय, या संपूर्ण प्रवासात आलेल्या तीन अपयशांनंतर चौथ्या प्रयत्नात मिळालेले यश त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला.
