‘love me or hate me but you can’t ignore me’ असं ढिंच्याक पूजानं म्हटलं तर काही चूकीचं ठरणार नाही. भलेही अनेकांना तिचा खूप राग येत असला तरी सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणाऱ्यांना तिला दुर्लक्षित करता येणं शक्य नाही हेही तितकंच खरं. कारण कोणत्या ना  कोणत्या फेसबुक पेजवर तिच्या गाण्यांचे  व्हिडिओ दिसतात. हा, गेले काही दिवस ढिंच्याक पूजाचे व्हिडिओ येणे बंद झालं होतं, पण काही वेळापूर्वीच पूजानं आपल्या यूट्युब चॅनेलवर लिरिक्स व्हिडिओ अपलोड केलाय. गेल्या आठवड्यात आपण लवकरच नवा व्हिडिओ घेऊन येणार अशी फेसबुक पोस्ट पूजाने अपलोड केली होती. पूजाने व्हिज्युअल व्हिडिओ अपलोड केला नसला तरी लिरिक्स व्हिडिओ मात्र अपलोड केलाय. ‘बापू देदे थोडा कॅश’ असं तिचं नव गाणं असणार आहे.

हा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड करून तिला अवघे काही तास झालेत  पण तिचा हा लिरिक्स व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर कमी वेळातच तुफान व्हायरल झालेला पाहायला मिळतोय. दोन आठड्यापूर्वी ढिंच्याक पूजाच्या यूट्युब चॅनलवरून तिचे व्हिडिओ काढून टाकण्यात आले होते. कथप्पा सिंह याच्या विनंतीवरून हे व्हिडिओ तिच्या यूट्युब चॅनेलवरून हटवले होते. यूट्युबच्या पॉलिसीनुसार जर तुमच्या परवानगीशिवाय तुम्ही एखाद्या व्हिडिओमध्ये दिसत असाल तर तो व्हिडिओ काढून टाकण्याची विनंती तुम्ही यूट्युबला करू शकता आणि याच पॉलिसीमुळे तिचे व्हिडिओ चॅनेलवरून हटवण्यात आले असल्याची चर्चा होती. तिचे १२ व्हिडिओ हटवण्यात आले होते. हे प्रकरण होण्याआधी काही दिवस तिच्यावर वाहतुकीचे नियम मोडले म्हणून दिल्ली वाहतूक पोलिसांनी कारवाई देखील केली होती. थोडक्यात काय दोन तीन आठवड्यांपासून वादामुळे चर्चेत असेली पूजा बऱ्याच दिवसांनंतर तिच्या गाण्यामुळे चर्चेत आलीय.