Dhirendra Krishna Shastri Got Trolled For Wearing Gucci Goggles: बागेश्वर धामचे प्रमुख आणि प्रसिद्ध कथाकार पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे अनेकदा चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. यावेळी चर्चेचे कारण त्यांचे ब्रँडेड जॅकेट आणि गॉगल ठरत आहेत. परदेश दौऱ्यादरम्यान धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी ६० हजार रुपये किमतीचे जॅकेट आणि ‘गुची’ या प्रसिद्ध ब्रँडचा गॉगल घातला होता, ज्यामुळे त्यांना ट्रोल केले जात आहे. यावर आता धीरेंद्र शास्त्री यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
धीरेंद्र शास्त्री सध्या फिजीमध्ये हनुमान कथा करत आहेत. सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जात असल्याचे समजताच त्यांनी स्पष्ट केले की, “ऑस्ट्रेलियामध्ये खूप थंडी होती. दीक्षा घेतलेल्या एका मुलीने मला एक जॅकेट दिले होते, ज्याची किंमत सुमारे ६०-६५ हजार रुपये असावी. ते कोणत्यातरी मोठ्या ब्रँडचे आहे.”
ते पुढे म्हणाले की, “जेव्हा मी समुद्रात गेलो तेव्हा स्वतःचे रक्षण करण्यासाठी मला महागडे चष्मे घालावे लागले, ज्याचा फोटो व्हायरल झाला आहे. आता काही लोक म्हणत आहेत की, बाबांचा जलवा आहे, काहीजण त्याचा आनंद घेत आहेत आणि काहीजणांना पोटदुखीची होत आहे.”
धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले, “जर १० रुपये कमावणारा माणूस २ लाख रुपयांचे जॅकेट घालू शकतो, तर मग एका महात्म्याने ६० हजार रुपयांचे जॅकेट घातले तर तुमच्या पोटात दुखण्याचे कारण काय?”
ते पुढे म्हणाले, “मी ते विकत घेतले नाही, माझ्या शिष्यांनी ते मला दिले. आणि जर तुम्हाला एवढीच अडचण असेल, तर पुढच्या वेळी मी १ लाख २० हजार रुपयांचे जॅकेट घालेन. तुम्ही व्हिडिओ बनवत राहा.”
धीरेंद्र शास्त्री यांनी या ट्रोलिंगला उत्तर देताना बॉलिवूडवरही टीका केली. ते म्हणाले, “सिगारेट, दारू आणि घाणेरड्या चित्रपटांनी मुलांचे नुकसान करणाऱ्या आणि तिकिटांच्या पैशांवर मजा करणाऱ्यांबद्दल काही बोलण्यास तुम्हाला भीती वाटते. हिंदूंवर भाष्य करणे सोपे आहे, परंतु इतर कोणत्याही धर्मावर भाष्य करण्याचा प्रयत्न करून तर पाहा.”
धीरेंद्र शास्त्री यांनी यावेळी ट्रोलर्सना इशारा दिला की, “जर तुम्ही पुन्हा कमेंट्स केल्या तर मी पराडाचा गॉगल आणि जॅक्सनचे जॅकेट घालेन! मला हे आवडत नाही, पण जर कोणी भेटवस्तू दिल्या तर त्याला नकार देत नाही. मी हिंदूंसाठी जगतो. जर तुम्हाला त्यात काही अडचण असेल तर ते तुमचे दुर्दैव आहे.”