Dhurandhar Dialogues In Exam Viral Video: सध्या सोशल मीडियावर एका अजब प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. परीक्षेत प्रश्नांची उत्तरे लिहायची सोडून एका विद्यार्थ्याने चक्क आपल्या उत्तरपत्रिकेत चित्रपटातले तडफदार संवाद (Dialogues) लिहिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर वाऱ्यासारखा पसरला असून, नेटकऱ्यांमध्ये हशा पिकला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार ‘बिझनेस स्टडीज’च्या (Business Studies) पेपरदरम्यान घडला. संबंधित विद्यार्थ्याची परीक्षेची तयारी नसल्याने त्याने उत्तरपत्रिका कोरी सोडण्याऐवजी किंवा थापा मारण्याऐवजी एक वेगळाच ‘फिल्मी’ मार्ग निवडला. त्याने संपूर्ण उत्तरपत्रिकेत एखाद्या चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे नाट्यमय संवाद लिहिले आहेत.
हे संवाद सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ‘धुरंधर-२’ या सिनेमातील आहेत. गंभीर शैक्षणिक वातावरणात या विद्यार्थ्याने दाखवलेली ही ‘कलाकारी’ पाहून शिक्षकही चक्रावून गेले आहेत.
उत्तरपत्रिकेत काय लिहिले?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये उत्तरपत्रिकेची काही पाने दिसत आहेत. त्यात विषयाशी संबंधित तांत्रिक उत्तरे असण्याऐवजी, ‘धुरंधर’ चित्रपटातील गाजलेले संवाद आणि काही ठिकाणी तर लांबलचक मोनोलॉग लिहिलेले दिसत आहेत. काही ठिकाणी विनोदी शैलीत तर काही ठिकाणी अत्यंत तीव्र आवेशात हे संवाद उतरवण्यात आले आहेत.
हा व्हिडिओ पाहून अनेकांनी याला ‘क्रिएटीव्हीटी’ आणि ‘कॉमिक टायमिंग’चा अजब नमुना म्हटले आहे. अभ्यासाचा ताण घेण्याऐवजी या विद्यार्थ्याने चक्क उत्तरपत्रिकेलाच चित्रपटाची स्क्रिप्ट बनवून टाकले.
सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस
हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर मजेशीर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी या परिस्थितीला वैयक्तिक अनुभवांशी जोडून पाहिले आहे. एका युजरने कमेंट केली, “धुरंधर २ ची क्रेझ आता हाताबाहेर गेली आहे, हे त्याचेच जिवंत उदाहरण!”
दुसऱ्या एकाने गंमतीत म्हटले की, “या मुलाने पेपर नाही तर धुरंधरची पूर्ण स्क्रीप्टच लिहिली आहे. त्याने हमझा अली मझारीचे संवाद इतक्या हुबेहूब कॉपी केले आहेत की, परीक्षकालाही वाटेल आपण बिझनेस स्टडीजचा पेपर नाही तर फॅन-फिक्शन वाचतोय.”
एका युजरने उपरोधिक टोला लगावला, “भावा, एवढ्या खोलात जाऊन संवाद लिहायची गरज नव्हती!” तर दुसऱ्याने लिहिले, “तुम्हाला चित्रपटाचे संवाद पाठ होऊ शकतात, पण सिलॅबस मात्र लक्षात राहत नाही.”
अशा घटना पहिल्यांदाच नाहीत
उत्तरपत्रिकेत अशा प्रकारचे विचित्र प्रकार घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत चक्क गाणी लिहिणे, परीक्षकाला पास करण्यासाठी भावनिक विनंती करणे, पैशांच्या नोटा चिकटवणे किंवा कविता लिहिण्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र, पूर्ण चित्रपट संवाद उतरवण्याचा हा ‘धुरंधर’ प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
सध्या हा विद्यार्थी कोण आहे आणि कोणत्या कॉलेजचा आहे, याची अधिकृत माहिती समोर आली नसली तरी, या प्रकरणाने ‘बॅकबेन्चर्स’च्या करामतींची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे.
