आपल्या एखाद्या अवयवाला इजा झाली तर पूर्ण आयुष्यच उद्धवस्त झाल्यासारखं वाटतं. शरीराला अपंगत्व आलंय म्हणून अनेक जण हार मानतात. काम जमणार नाही म्हणून दुसऱ्यांवर अवलंबून राहतात. विचार करा एखाद्याच्या आयुष्यात असं दुखणं किंवा व्यंग कायमचं असेल तर… तर काय याचं उत्तर दिलं आहे ते अमेरिकेतल्या एका दिव्यांग खेळाडूने. अमेरिकेतला दिव्यांग अ‍ॅथलीट जिओन क्लार्क हा फक्त अर्ध्या शरीरावर जगत आहे. मात्र, याही परिस्थितीत त्याच्या जगण्याला तोड नाही. पाय नसले म्हणून काय झालं ? असं म्हणत त्याने आपल्या हातावर सर्वात वेगाने चालत अनोखा विक्रम रचलाय.

जिओन क्लार्क हा एक उद्योजक, प्रेरक वक्ता, अभिनेता, लेखक आणि खेळाडू असून जन्मापासूनच त्याला पाय नाहीत. परंतू, आता गिनिज बुकच्या यादीत त्याचं नाव घेतलं जातंय. २३ वर्षीय जिओन क्लार्कने आपल्या हातांवर सर्वात वेगाने २० मीटर अंतर चालत नवा विश्वविक्रम रचला आहे. हे अंतर त्याने अवघ्या ४.७६ सेकंदात पूर्ण करून सर्वांना आश्चर्यचकित करून सोडलंय. सर्वात वेगवान चालणं तेही हातांवरून….हे शक्यच नाही….! असं प्रत्येकाच्याच मनात विचार येईल. जिओन क्लार्कला पाहून आपल्या प्रत्येकाला असंच वाटेल. मात्र आपल्याला अशक्य वाटणारी गोष्ट जिओन क्लार्कने मात्र शक्य करून दाखवली.

जिओन क्लार्क हा जन्मतःच कॉडल रिग्रेशन सिंड्रोमने ग्रस्त आहे. यात माणसाच्या शरीराच्या खालचे अवयव विकसीत न झाल्याने मणक्याचे हाडे विकसीत होत नाहीत. पण जन्मतः असलेल्या दिव्यांगामुळे तो खचला नाही. शाळेत असताना त्याने जीममध्ये घाम गाळत पिळदार शरीरयष्टी बनवली. त्याच्या शाळेत तो पैलवान देखील बनला. तो एक मोटिवेशनल स्पीकर सुद्धा आहे. तसंच एक लेखक म्हणूनही त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आता त्याने हॉल ऑफ फेममध्ये प्रवेश केला आहे.

क्लार्कच्या ४.७८ सेकंदात हातावर वेगाने चालण्याच्या अनोख्या विक्रमाची नोंद नुकतीच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलीय. हा अनोखा विक्रम त्याने फेब्रुवारी २०२१ मध्येच रचला होता. नुकतीच त्याच्या या अनोख्या विश्वविक्रमाला अधिकृतरित्या मान्यता मिळाली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने त्याच्या या विक्रमाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.

जिओन क्लार्कने सुद्धा त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करत त्याचा आनंद व्यक्त केला. तो म्हणाला की, “अखेर मी घोषित करतो की गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये माझ्या विश्वविक्रमाची नोंद करण्यात आलीय. २० मीटरसाठी दोन हातांवर चालणारा सर्वात वेगवान माणूस ही माझ्यासाठी एक मोठी कामगिरी आहे. मी माझा पुढील गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार करण्यासाठी तयार आहे.”

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डशी बोलताना त्याने अपंग आणि दिव्यांगांसाठी एक खास संदेश देखील दिलाय. कुणालाही तुम्ही काय करू शकत नाही हे सांगू नका. दृढ निश्चय असेल तर तुम्हीही कोणतंही ध्येय गाठू शकता, असं त्याने म्हटलंय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओवर कमेंट्स करत नेटकरी मंडळी त्याच्या या यशाचं कौतुक करताना दिसून येत आहेत.