Dimple Yadav Helps Injured Protester Video Goes Viral: आई म्हणजे माया, आधार आणि संकटाच्या क्षणी धावून येणारा हात. एखादा माणूस अडचणीत असताना त्याला मदतीचा हात देणं हीच खरी माणुसकी असते. दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान घडलेली अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी अत्यवस्थ झालेल्या आंदोलनकर्त्याच्या मदतीसाठी तत्काळ धाव घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यांच्या या कृतीचे अनेकांकडून कौतुक होत आहे.

दिल्लीतील जंतर-मंतर येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू असताना अचानक एक आंदोलनकर्ता अत्यवस्थ झाला आणि तो जमिनीवर कोसळला. परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्याच वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांची नजर त्या तरुणावर पडताच त्यांनी कोणताही विलंब न करता, त्याच्याकडे धाव घेतली.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये डिंपल यादव या थेट जमिनीवर बसून त्या आंदोलनकर्त्याची विचारपूस करताना दिसतात. त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करताना त्या त्याला स्वतः पाणी पाजत असल्याचेही दिसते. एवढेच नव्हे, तर त्या आसपास उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना आणि सहकाऱ्यांना आवश्यक मदत करण्याच्या सूचनाही देताना दिसत आहेत. जखमी आंदोलनकर्त्याला तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी त्या सतत प्रयत्न करीत असल्याचे व्हिडीओत पाहायला मिळते.

या व्हिडीओतील आणखी एक बाब अनेकांच्या नजरेत भरली. डिंपल यादव यांच्या स्वतःच्या हातावर पट्टी बांधलेली असल्याचे दिसत असतानाही त्यांनी स्वतःच्या दुखापतीकडे दुर्लक्ष केले. त्या जखमी तरुणाजवळ बसून, त्याला हवा घालत असल्याचे तसेच आजूबाजूच्या लोकांना त्याला थंड पाणी किंवा आवश्यक मदत पुरवण्यास सांगत असल्याचेही व्हिडीओमध्ये दिसते. आंदोलनाच्या गोंधळात त्यांनी दाखवलेली ही संवेदनशीलता अनेकांना भावली आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, हजारो नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकी दाखवली असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. काहींनी त्यांच्या कृतीचे कौतुक करीत “आईची माया अशीच असते,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर काहींनी संकटाच्या क्षणी एखाद्या जखमी व्यक्तीच्या मदतीला धावून जाणे हीच खरी संवेदनशीलता असल्याचे म्हटले आहे.

अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी आजच्या काळात नेत्यांवर केवळ प्रसिद्धीसाठी काम केल्याचे आरोप होत असताना, डिंपल यादव यांनी कोणताही दिखाऊपणा न करता जखमी आंदोलनकर्त्याला केलेली मदत मन जिंकणारी असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून, या कृतीमुळे त्यांचे कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया सातत्याने समोर येत आहेत.

येथे पाहा व्हिडीओ

दरम्यान, हा व्हिडीओ दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यानचा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या घटनेबाबत किंवा जखमी आंदोलनकर्त्याच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलेल्या दृश्यांमुळे डिंपल यादव यांच्या या संवेदनशील कृतीची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.