सोशल मीडियावर कधी कधी असे काही व्हिडीओ समोर येतात, जे थेट मनाला भिडतात. असे व्हिडीओ पाहिल्यानंतर आयुष्याकडे पाहण्याची आपली दृष्टी थोडी बदलते. रोजच्या धावपळीत आपण अनेकदा तक्रार करतो, असमाधानी राहतो, पण असे क्षण आपल्याला थांबून स्वतःकडे पाहायला भाग पाडतात. या व्हिडीओमध्ये ना मोठे शब्द आहेत, ना कोणताही दिखावा; तरीही काही साध्या वाक्यांतून आयुष्याचा खरा अर्थ समजतो. आत्मसन्मान, मेहनत आणि समाधान या गोष्टी एकत्र आल्या की खरी प्रेरणा कशी मिळते हे यातून दिसून येते, म्हणूनच हा व्हिडीओ पाहणाऱ्याला विचार करायला लावतो की आपण आपल्या आयुष्यात खरंच किती खूश आहोत.

या व्हिडीओमध्ये एक दिव्यांग झोमॅटो डिलिव्हरी पार्टनर आपल्या आयुष्याबद्दल अगदी शांतपणे आणि प्रामाणिकपणे बोलताना दिसतो. साधारण दीड मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये आयुष त्याला “तुम्ही काय करता?” असा साधा प्रश्न विचारतो. त्यावर तो सांगतो की तो झोमॅटोमध्ये फूड डिलिव्हरीचे काम करतो. तो म्हणतो की, दिव्यांग लोकांसाठी हे काम खूप महत्त्वाचे आहे. तो आपल्या कमाईबद्दलही मोकळेपणाने बोलतो. महिन्याला साधारण १० ते १२ हजार रुपये मिळतात आणि एका डिलिव्हरीसाठी ३० ते ५० रुपये मिळतात.

“या पैशांत जगणं थोडं कठीण आहे, पण समाधान मानायला शिकायला हवं,” असं तो सांगतो. तो आयआयटी चेन्नईच्या इंजिनिअर्सनी बनवलेल्या ‘नियोमोशन’ नावाच्या खास व्हीलचेअर सायकलवर काम करतो. त्याची बायकोही दिव्यांग असल्यामुळे जबाबदारीच त्याला रोज काम करण्याची प्रेरणा देते. हा राइडर राष्ट्रीय पातळीवरील टेबल टेनिस खेळाडू असून भारतासाठी मेडल जिंकण्याचं स्वप्न पाहतो. शेवटी तो एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, “काम तर करावंच लागतं, मग ते आनंदानेच का करू नये? ”

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ लोकांच्या मनाला थेट भिडला आहे. अनेकांनी प्रतिक्रियांमध्ये लिहिलं की, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर स्वतःच्या आयुष्यातील छोट्या-छोट्या तक्रारी किती क्षुल्लक वाटू लागल्या. काहींनी त्याच्या आत्मसन्मानाला आणि सकारात्मक दृष्टिकोनाला सलाम केला, तर काहींनी “खरी मोटिव्हेशन म्हणजे हेच” अशा प्रतिक्रिया दिल्या.

अनेक युजर्सनी त्याला आयुष्याचा मौल्यवान धडा दिल्याबद्दल धन्यवाद मानले. कोणताही दिखावा न करता, कोणताही उपदेश न करता, फक्त स्वतःचं सत्य मांडून त्या दिव्यांग डिलिव्हरी पार्टनरने सोशल मीडियावर मन जिंकलं आहे. हा व्हिडीओ केवळ व्हायरल कंटेंट न राहता, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणारा अनुभव ठरत आहे.