Shocking Video : पालक आवड म्हणून आपल्या लहान मुलांना सोन्याचे कानातले किंवा बाली घालतात. पण, अनेकदा लहान मुलांकडून खेळताना वगैरे सोन्याच्या वस्तू हरवण्याचा संभव असतो. चोरदेखील लहान मुलांना लक्ष्य करून त्यांचे दागिने चोरताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका चोराच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. त्यामुळे पालकांनो, तुम्हीही लहान मुलांना दागिने घालत असाल, तर थोडी दक्षता बाळगा. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान मूल घराबाहेर खेळत असते. दरम्यान, सिलिंडर घेऊन आलेली एक व्यक्ती त्याच्याजवळ थांबते आणि त्याचा हात पकडून बोलू लागते. व्हिडीओत ती व्यक्ती सिलिंडर बाजूला ठेवून पटकन खाली बसल्याचे दिसते. यावेळी ती मुलाच्या कानाला हात लावते आणि आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून त्याचे सोन्याचे कानातले चोरते आणि खिशात टाकते. त्यानंतर त्या मुलाची आई बाहेर येते आणि मुलाला घरात घेऊन जाते. घरात नेल्यानंतर मुलाच्या आईला मुलाच्या कानातले चोरीला गेल्याचे लक्षात आले. तेव्हा ती मुलाला घेऊन पुन्हा घराबाहेर येते. पण, तोपर्यंत सिलिंडर घेऊन आलेली व्यक्ती सिलिंडर तसाच ठेवून पळून गेल्याचे दिसते. यावेळी मुलाला ठेवून, त्याची आई मदतीसाठी वरच्या मजल्यावर धाव घेते. त्यांच्या घराबाहेर घडलेला हा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. Read Trending News : ‘मॅडम मी येणारंच नाही!’ विद्यार्थ्याचा सुट्टीसाठी थेट मुख्याध्यापकांना अर्ज, Photo तील शेवटची लाईन वाचून पोट धरून हसाल हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी, लहान मुलांना अनोळखी व्यक्तीच्या भरवशावर घरात एकट्याला सोडून कुठे जाऊ नका. तसेच लहान मुलांच्या अंगावर सोन्याचे दागिने घालू नका, असे आवाहन केले आहे. काहींनी हा व्हिडीओ फेक असल्याचे म्हणत फक्त लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी बनविण्यात आल्याचे म्हटले आहे. दरम्यान, युजर्स या व्हिडीओवर आता वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. अनेकांनी लहान मुलांच्या अंगावर सोन्याचे दागिने घालण्याची काय गरज होती, असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर काही जण, पालकांच्या निष्काळजीपणामुळे असे घडत असल्याचे मत व्यक्त करीत आहेत.