२४ तास रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असणं हे डॉक्टरांचं पहिलं कर्तव्य आहे. अशाच एका कर्तव्यनिष्ठ महिला डॉक्टरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही महिला डॉक्टर स्वत: गर्भवती होती. तिची प्रसुतीची तारीख होती. आपल्या खोलीत आराम करत असताना प्रसुती वेदनेने कळवळणाऱ्या महिलेचा आवाज तिच्या कानावर पडला. तिच्याच बाजूच्या खोलीत ही गर्भवती महिला होती. अचानक तिला प्रसुतीकळा सुरू झाल्या, नाळ बाळाच्या गळ्याभोवती अडकल्याने तिच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. तातडीने तिची प्रसुती करणं आवश्यक होतं. पण यावेळी नेमके डॉक्टर उपस्थित नव्हते. जर आणखी थोडा वेळ डॉक्टरांची वाट पाहिली असती तर बाळाला आपला जीव गमवावा लागला असता. ही सारी परिस्थिती लक्षात घेऊन या महिला डॉक्टरने तडक तिच्या खोलीत धाव घेतली.

नर्सच्या मदतीने तिने या महिलेची प्रसुती केली. बाळ आणि बाळंतीण दोन्ही सुखरूप आहेत. विशेष म्हणजे तिची प्रसुती करुन झाल्यानंतर या महिला डॉक्टरने काही मिनिटांतच आपल्या बाळाला जन्म दिला. डॉक्टर अमांडा हेस असं या डॉक्टरचं नाव असून आपल्या नुकत्याच जन्मलेल्या गोंडस बाळाला कुशीत घेतलेला तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ‘डॉक्टर मॉम’वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.