Dog and hanumanji emotional video: भक्ती म्हणजे फक्त माणूसच करू शकता, असं नाही; पण उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेनं ही समजूतच मोडून काढली आहे. एका मंदिरात चक्क एक कुत्रा तासन् तास हनुमानाच्या मूर्तीभोवती प्रदक्षिणा घालत असल्याचं दृश्य समोर आलं आहे. हे दृश्य पाहून भाविकच नव्हे, तर सामान्य नागरिकही आश्चर्यचकित झाले. कुणाला हे भक्तीचं रूप वाटलं, तर कुणाला हा निसर्गाचा गूढ संकेत वाटला.
सध्या ही घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरली आहे.व्हायरल झालेला हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील एका हनुमान मंदिरातील आहे. या व्हिडीओमध्ये पहाटेच्या शांत वातावरणात मंदिराच्या गाभाऱ्यात हनुमानाची मूर्ती दिसते आणि त्या मूर्तीभोवती एक कुत्रा सलग फेऱ्या मारताना दिसतो. विशेष म्हणजे तो कुत्रा ना थांबतो, ना कुणाकडे पाहतो, फक्त शांतपणे प्रदक्षिणा घालत असल्याचे दिसतो.
व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं की, तो कुत्रा अनेक तासांपासून एकसारख्या गतीनं मूर्तीभोवती फिरतो आहे. त्याच्या हालचालींमध्ये कुठलीही घाई नाही, गोंधळ नाही. जणू काही तो मनापासून देवाकडे काही मागत आहे. अशा पद्धतीनं तो प्रदक्षिणा घालत आहे . स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे सुमारे ४ वाजल्यापासून हा कुत्रा मंदिरात होता. सकाळ झाली, लोक येऊ लागले, तरीही त्याची प्रदक्षिणा सुरूच होत्या.
पाहा व्हिडीओ
हे दृश्य पाहण्यासाठी मंदिरात लोकांची गर्दी जमू लागली आणि अनेकांनी मोबाईलमध्ये तो क्षण कैद केला.हा व्हिडीओ ट्विटरवर @Anti_LJ_Force या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, लाखो लोकांनी तो पाहिला आहे. व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी या कुत्र्याला “हनुमानजींचा निस्सीम भक्त” असं म्हटलं आहे. तर काही युजर्सनी त्यामागे वैद्यकीय कारण असू शकतं, असं मत मांडलं आहे.
एका युजरनं लिहिलं, “प्राण्यांमध्येही भक्ती असते; फक्त ती बोलून दाखवता येत नाही.” तर दुसऱ्यानं म्हटलं, “हे भक्ती नाही, याकडे वेगळ्या नजरेनं पाहायला हवं.” काही लोकांनी मात्र सरळ सरळ “या कुत्र्याच्या भक्तीला सलाम” असं म्हणत भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
