Leopard vs Dog Fight Video :  बिबट्या क्रूर आणि धूर्त शिकारी प्राणी मानला जातो, जो झडप घालून प्राण्याची शिकर करतो, त्यामुळे अनेक मोठे प्राणीदेखील त्याच्यापासून दूर पळतात. सोशल मीडियावरही बिबट्याच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात चक्क एका श्वानाने मैत्रीचे कर्तव्य निभावले आहे, तो चक्क चवताळलेल्या बिबट्याशी भिडला, हे दृश्य पाहून कोणाचाही विश्वास बसणार नाही.

हा व्हायरल व्हिडीओ एका डोंगराळ भागातील आहे. सकाळचं आल्हाददायक वातावरण आहे, आकाश पिवळसर रंगाचे झालेय, अशा शांत वातावरणात जमिनीवर एक क्रूर शिकारी कुत्र्यांची शिकार करण्यासाठी दबा धरून बसला होता. तिथे तीन कुत्रे खेळत होते, पण काही क्षणांत त्यांच्याबरोबर काय घडणार आहे याची त्यांनी कल्पनाही केली नसेल. बिबट्या दूरवरून दबा धरून योग्य क्षणाची वाट पाहत होता. यावेळी धोका जाणवताच दोन कुत्रे लगेच पळून गेले, पण तिसऱ्या कुत्र्याला काही कळायच्या आतच बिबट्या त्याच्यापर्यंत पोहोचला आणि त्यामुळे त्याला पळून जाण्यासाठी वेळच मिळाला नाही.

बिबट्याने झडप घालून कुत्र्याला आपल्या पंजात घट्ट पकडून ठेवले. त्याच वेळी एक काळा कुत्रा, मित्र म्हणून आपले कर्तव्य निभावण्यासाठी धावत आला, त्याने मृत्यूची पर्वा केली नाही आणि तो थेट बिबट्याच्या दिशेने धावला. कुत्रा ज्या वेगाने धावला ते पाहून बिबट्याने आपली शिकार सोडून पळ काढला. अशाप्रकारे त्याने बिबट्यापासून आपल्या मित्राचे प्राण वाचवले.

लोकांनाही कुत्र्याचे धाडस आणि त्याची मैत्रासाठी केलेली कृती खूप आवडली आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे माहिती नाही, हा व्हिडीओ एआय (AI) वापरून तयार केला गेला असावा असेही काहींचे मत आहे.

@jawai_leopard_safari_bookings_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, जो आतापर्यंत १० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय, तर हजारो लोकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. युजर्स त्या कुत्र्याच्या शौर्याचे कौतुक करत आहेत.

एका युजरने लिहिले की, “कुत्र्याने आपल्या मैत्रीला न्याय दिला.” दुसऱ्याने लिहिले की, “या कुत्र्याकडून मैत्रीचा अर्थ शिकायला हवा.” आणखी एकाने लिहिले की, “जेव्हा असा मित्र तुमच्यासोबत असेल तर भीती कशाची?”