Dolphins viral video: मुंबई म्हणजे धावपळ, ट्रॅफिक,अतिउंच इमारती आणि कधीही न थांबणारी गर्दी. अशा या मायानगरीत कधीतरी शांततेची झलक दिसते. पण, अलीकडेच मुंबईकरांना असा अनुभव आला, जो अनेकांना आश्चर्यचकित करणारा आणि मनाला सुखावणारा आहे. वरळी सी फेसजवळ समुद्रात चक्क डॉल्फिन्स दिसल्याने त्याबाबत एकच चर्चा रंगली. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात अचानक समोर आलेले हे दृश्य अनेकांसाठी अविस्मरणीय ठरले.
सकाळ-संध्याकाळी चालायला येणारे लोक, फोटो काढणारे तरुण, कुटुंबांसह फिरायला आलेले मुंबईकर असे सगळेच काही क्षणांसाठी थांबले. समुद्राकडे बघत उभे राहिले आणि निसर्गाच्या या सुंदर देखाव्याचे ते साक्षीदार झाले. मुंबईसारख्या महानगराच्या किनाऱ्यावर डॉल्फिन्स दिसणे ही आजपर्यंत अशक्यप्राय बाब ठरली आहे आणि त्यामुळेच हा क्षण अधिक खास बनला.
कोरोना काळात जेव्हा माणसांची गर्दी कमी झाली होती, तेव्हा निसर्ग पुन्हा फुलताना दिसला होता. आता तब्बल काही वर्षांनंतर पुन्हा एकदा डॉल्फिन्स मुंबईच्या जवळ येताना दिसल्याने अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला – समुद्र पुन्हा स्वच्छ होतोय का? निसर्ग पुन्हा आपली वाट शोधतोय का?
पाहा व्हिडिओ
ही बातमी केवळ एक व्हिडीओ व्हायरल झाल्यासंबंधीची नाही, तर शहर आणि निसर्ग यांच्यातील नात्याची आठवण करून देणारी आहे.-हा व्हिडीओ मुंबईच्या प्रसिद्ध वरळी सी फेस परिसरातील आहे. समुद्राच्या अगदी काठाजवळ, शहरी गोंगाटाच्या पार्श्वभूमीवर डॉल्फिन्स पोहताना दिसत आहेत. हा व्हिडीओ एका नागरिकाने मोबाईलमध्ये शूट करून, तो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
व्हिडीओच्या सुरुवातीला वरळी सी फेसवर उभे असलेले काही लोक समुद्राकडे उत्सुकतेने पाहताना दिसतात. कॅमेरा जसजसा झूम होतो, तसतशी निळ्याशार पाण्यात हालचाल दिसू लागते. काही क्षणांतच डॉल्फिनचा एक छोटा भाग पाण्याच्या वर येतो, पुन्हा आत जातो. त्यांच्या पाठीवरील पर (फिन्स) स्पष्ट दिसतात. वरून उडणारे पक्षी आणि शांत समुद्र यांमुळे हे दृश्य अजूनच सुंदर बनते.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेकांनी आनंद व्यक्त करीत “मुंबईत असा निसर्गाचा चमत्कार पाहून मन प्रसन्न झालं” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी, “कोरोना काळानंतर पुन्हा ५ वर्षांनी दिसले,” असे लिहिले आहे. तर काहींनी गमतीशीर प्रतिक्रिया देत “धुरंधर बघायला आले असतील” असे म्हटले आहे. अनेकांनी समुद्र स्वच्छ ठेवण्याचे आवाहनही केले आहे.
