दूरदर्शनचा आज ६२ वा वाढदिवस; ट्विटरवर झळकल्या अविस्मरणीय आठवणी

दूरदर्शनला आज ६२ वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने सोशल मीडियावरील युजर्सनी ट्विट करत दूरदर्शनच्या जून्या आठवणींना उजाळा दिलाय.

doordarshan-turns-62

दूरदर्शनला आज ६२ वर्षे पूर्ण झाले आहेत. आजच्या ब्रेकिंग न्यूजच्या काळात दूरदर्शनने आपल्या प्रेक्षकांसाठी अचूक आणि अद्ययावत बातम्यांची परंपरा कायम ठेवली आहे. एकेकाळी याच दूरदर्शन वाहिन्यावर महाभारत, रामायण, चित्रहार आणि मालगुडी डेजसारख्या प्रतिष्ठित मालिका सुद्धा बऱ्याच गाजल्या. स्टुडिओ आणि ट्रान्समीटर इन्फ्रास्ट्रक्चरमधील भारतातील सर्वात मोठ्या प्रसारण संस्थांपैकी एक असलेल्या दूरदर्शनची स्थापना १५ सप्टेंबर १९५९ रोजी झाली. दूरदर्शनच्या आजच्या वाढदिवशी सोशल मीडियावर यूजर्सनी दूरदर्शनच्या जून्या अविस्मरणीय आठणींना उजाळा देत वेगवेगळ्या पोस्ट शेअर केल्या आहेत.

दूरदर्शन आणि डीडी न्यूजचे महासंचालक मयंक अग्रवाल यांनी प्रेक्षकांचे आभार व्यक्त करण्यासाठी ट्वीट केलं. यात त्यांनी लिहिलं, “६२ वर्षांचा घटनात्मक प्रवास… स्थापना दिवसानिमित्त, #दूरदर्शन प्रेक्षकांचे प्रेम आणि सतत पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. उच्च नैतिक मानके राखणे आणि चॅनेलच्या माध्यमातून विविध लोकसंख्येपर्यंत पोहोचणे ही आमची मुख्य उद्दिष्टे आहेत. हीच उद्दीष्ट कायम ठेवण्याचं आम्ही आश्वासन देतो.”


दूरदर्शनच्या आजच्या स्थापना दिनानिमित्ताने दूरदर्शनने एक ट्विट शेअर करत युजर्सना #MemoriesWithDD हॅशटॅग वापरून चॅनेलसह त्यांच्या आठवणी शेअर करण्याचं आवाहन केलं होतं. दूरदर्शनच्या आजच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये युजर्सनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत दूरदर्शनच्या जून्या आठवणींना उजाळा दिला. आज दिवसभर #MemoriesWithDD हा हॅशटॅग ट्रेंड करत होता.

दूरदर्शनने युजर्सना केलेल्या या आवाहनानंतर सोशल मीडियावर आज नॉस्टॅल्जिया ओसंडून वाहत होता. लोकांना त्यांच्या बालपणी पाहिलेले शो आठवले. महाभारत ते रामायण, चित्रहार, डक टेल्स, जंगल बुक, फौजी, मालगुडी डेज पर्यंत अशा अनेक मालिकांची नावं पुन्हा एकदा झळकली. या मालिकेतील स्वतःची आवड व्यक्त करत लोकांनी दूरदर्शनवरचं प्रेम व्यक्त केलं. अनेकांनी तर दूरदर्शनचा आयकॉनिक लोगो पोस्ट केला. एका वैशिष्ट्यपूर्ण सूरात कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी समोर दिसणारा हा लोगो आजही लोकांचा आवडीचा ठरलाय.

आणखी वाचा : ताऱ्यांचे बेट… नासाने शेअर केलेले हे फोटो पाहून Speechless व्हाल

सोशल मीडियावर दिवसभर सुरू असलेल्या या ट्रेंडमुळे अनेकांना दूरदर्शनच्या त्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट पडद्यावरच्या अफलातून मालिका आणि त्या पाहण्यासाठी एका छोट्या घरात भरमसाठ लोकांची गर्दी होत असलेले दिवस आठवले.


दूरदर्शन बद्दल आणखी काही…
15 सप्टेंबर 1959 मध्ये दूरदर्शनची सेवा सुरु झाली. दूरदर्शन, आज जगातली सर्वात मोठी प्रसारण संस्था असून राष्ट्र उभारणीत तिची मोठी मोलाची भूमिका आहे. बातम्यांची विश्वासार्हता, सर्वांसाठी मनोरंजन यात दूरदर्शनची बरोबरी कोणी करु शकणार नाही. दूरदर्शनचे सर्वात पहिले संचालक होते प्रत्येक मराठी माणसाचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे. पु.ल. देशपांडे यांनीच ‘दूरदर्शन’ हे नाव सुचवले होते.

आणखी वाचा : मुलांना स्मार्ट बनवण्यासाठी दिलं जातंय कोंबडीच्या रक्ताचं इंजेक्शन

१९६५ सालापासून दूरदर्शनवरून बातमीपत्र सुरू झाले. त्यानंतर १९७२ मध्ये दूरदर्शन सेवा मुंबईत आली. १९७५ मध्ये चेन्नई, अमृतसर, लखनऊ या शहरांमध्ये सुद्धा दूदर्शनचे प्रसारण सुरू झाले. उपग्रहाद्वारे सामाजिक शिक्षण देण्याचा पहिला प्रयोग भारतात करण्यात आला. १९८२ मध्ये दिली आणि अन्य ट्रान्समिटर्स दरम्यान उपग्रहांमार्फत प्रसारण सुरू करण्यात आले. त्यानंतर १९८२ मध्ये टीव्ही रंगीत झाला.

त्यानंतर दूरदर्शन हे ३४ उपग्रह वाहिन्यांचे संचालन करणारे नेटवर्क बनले. दूरदर्शन वाहिनीमधून बॉलिवूड स्टार शाहरुख खानने सुद्धा त्याच्या ‘फौजी’ मालिकमधून आपली कारकीर्द सुरू केली होती.

चित्राहार, महाभारत, देख भाई देख, फौजी, मालगुडी डेज सारख्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि ९० च्या दशकाच्या सुरुवातीला लोकांच्या मनावर राज्य केलं आणि लोकांना एकत्र आणणारे शुद्ध मनोरंजन देण्याचं कार्य सुरू केलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Doordarshan turns 62 we pick your favourite nostalgic moments ramayan mahabharata chitrahar malgudi days tweets prp