देशात रस्ते अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेत वाहतुकीचे कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. तरीही अनेक चालक स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालून निष्काळजीपणे वाहन चालवत असल्याच्या अनेक घटना दररोज समोर येतात. कोणत्याही पोलिस कारवाईला न जुमानता काही चालक भररस्त्यात बेदरकारपणे गाडी चालवताना दिसतात. अशाप्रकारे उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील हायवेवर बुधवारी रात्री हॉलीवूड चित्रपट फास्ट अँड फ्युरियससारखे थरारक दृश्य पाहायला मिळाले. हायवेवरून भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कारला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र कार चालकाने गाडी रिव्हर्स गियरवर टाकून दोन किलोमीटरपर्यंत पळवली. यावेळी हायवेवर पोलिस आणि कारचालकामध्ये थरारक अशी रेस रंगल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही धडकी भरेल.

ही संपूर्ण घटना गाझियाबादमधील इंदिरापूरम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एलिव्हेटेड रोडवर घडली. यावेळी पोलिस कारचालकाला पकडण्यासाठी पाठलाग करत होते, मात्र त्याने कार रिव्हर्स गिअरवर टाकली आणि पोलिसांना चकवा देत पळून गेला. पण, भर हायवेवरील पोलिस आणि मद्यपी कारचालकाच्या थरारक घटनेचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भरहायवेवर पोलिस कार हूटर वाजवत एका कारला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण कारचालकाने कार न थांबवता रिव्हर्स गिअरवर टाकली आणि दोन किलोमीटरपर्यंत उलटी पळवली. हायवेवर जवळपास अर्धा तास पोलिसांना आपल्यामागे पळवल्यानंतर कारचालक तेथून चकवा देत फरार झाला. इतक्या प्रयत्नांनंतरही कारचालकाला पकडण्यात अपयश आल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले जात आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, गाझियाबादच्या इंदिरापूरम पोलिस ठाण्याच्या भागातील पोलिसांना माहिती मिळाली की, काही लोक बेशिस्तपणे गाडी चालवत आणि दारू पिऊन i20 कारमधून येत आहेत. यावेळी पोलिसांनी नाकाबंदी करत या कारचालकाला कानवानी कटाजवळ थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांची गाडी त्यांच्या समोर येताच कारचालकाने कार रिव्हर्स गिअरमध्ये टाकून उलटी पळवण्यास सुरुवात केली. जवळपास अर्धा तास पोलिस आणि कारचालकात हा थराराक प्रकार सुरू होता. यावेळी मागून भरधाव वेगाने येणारी अनेक वाहने थोडक्यात बचावल्याचे व्हिडीओत तुम्ही पाहू शकता.

मात्र, बराच वेळ पाठलाग करूनही आरोपी तरुण वाहनासह घटनास्थळावरून पळून गेला. यानंतर पोलिस आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे तपास करत असून आरोपींवर गुन्हा दाखल करणार असल्याची चर्चा सुरू आहे.