घरून काम करत असताना जर नीटनेटके कपडे परिधान केले तर त्यामुळे तुमच्या कार्यक्षमता (Productivity) आणि व्यावसायिक मानसिकतेवर (Professional Mindset) मोठा सकारात्मक फरक पडतो, असे मत गुगलमधील एक ३६ वर्षीय सिनियर मॅनेजर आंचल मिर्झा यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या विधानामुळे सध्या मिर्झा या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

गुगलच्या ‘डेटा-सेंटर ऑप्टिमायझेशन’शी संबंधित स्ट्रॅटेजी आणि ऑपरेशन्स विभागात काम करणाऱ्या मिर्झा यांनी बिझनेस इनसायडरशी बोलताना यासंबंधी विधान केले. त्यांनी सांगितले की, जेव्हा त्या स्वत:च्या दिसण्यावर मेहनत घेतात, तेव्हा त्या अधिक चांगली कामगिरी करतात. त्यांच्या मते, घरून काम असो किंवा ऑफिसमधून, थोडे अधिक औपचारिक पद्धतीचे कपडे परिधान केल्याने त्यांना एकाग्र आणि परिणामकारक वाटण्यास मदत होते.

कोरोना महामारीच्या काळातील ‘वर्क कल्चर’बाबत बोलताना मिर्झा म्हणाल्या की, सुरुवातीला त्यांनी मेकअप आणि किमान एक पॉलिश केलेला टॉप घालून गोष्टी साध्या ठेवण्यावर भर दिला होता. मात्र, कालांतराने त्या पुन्हा पूर्ण पेहराव करण्याकडे वळल्या, कारण यामुळे त्यांच्या दिनचर्येत फार गुंतागुंत होत नव्हती, उलट यामुळे त्यांचया दिवसभरातील मानसिकतेत मोठी सुधारणा झाली.

मिर्झा यांनी सांगितले की, सकाळचा वेळ वाचावा यासाठी त्यांच्याकडे फार विचार न करता परिधान करता येतील असे कपड्यांचे काही ठराविक पर्याय होते. त्यांनी सांगितले की, “मी कोठूनही काम करत असले, तरी माझे दोन ‘युनिफॉर्म’ ठरलेले आहेत, जे मला कॅज्युअल आणि बिझनेस स्टाईलमध्ये बॅलन्स राखण्यास मदत करतात. मी एकतर जीन्ससोबत एखादा पॉलिश्ड टॉप किंवा स्वेटर घालते, किंवा चांगल्या स्लॅक्ससोबत एखादा जास्त कॅज्युअल शर्ट परिधान करते,” असे त्यांनी सांगितले.

मिर्झा यांनी सांगितले की त्यांनी न्यूट्रल रंगाना पसंती देतात, कारण ते त्यांच्या वॉर्डरोबमधील कपड्यांशी सहज मिक्स अँड मॅच करता येतात आणि निर्णय घेण्याचा अनावश्यक वेळ वाचतो. “जर मी एक पांढऱ्या रंगाची स्लॅक्स निवडली, तर माझ्याकडे त्यावर चांगले दिसतील असे २० क्रीम रंगाचे स्वेटर्स आहेत. त्यामध्ये मी मिक्स अँड मॅच करण्याचा प्रयत्न करेन असे कोणतेही विचित्र रंगाचे कपडे नाहीत. माझ्या या सिस्टममुळे सकाळचा निर्णय घेण्याचा मानसिक गोंधळ कमी होतो,” असे त्यांनी बिझनेस इनसायडरशी बोलताना सांगितले.

मिर्झा यांनी भर देऊन सांगितले की, नीटनेटके तयार होण्याने त्यांची उत्पादकता वाढण्यास मदत झाली. त्या म्हणाल्या, “जेव्हा मी तयार होते, तेव्हा मला नक्कीच अधिक प्रोडक्टिव्ह वाटते. मी अधिक कार्यक्षमही असते. कपडे परिधान करणे आणि मेकअप करणे हे माझ्या मेंदूला संकेत देते की, आता काम करण्याची वेळ झाली आहे आणि आज मी माझ्या ‘टू-डू’ लिस्टवरील सर्व कामे पूर्ण करणार आहे.”