लग्नसमारंभात नवऱ्याची वरात घेऊन येताना डीजे, ढोल-ताशा, बँजो हमखास वाजवण्यात येतात. या सगळ्यांशिवाय लग्न समारंभ अपूर्ण आहे. ढोलक किंवा बँजो वाजवणाऱ्यांना त्यांच्या उत्तम सादरीकरणामुळे आनंदाने पैसे दिले जातात. तर आज सोशल मीडियावर याचसंबंधित एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यात एका व्यक्तीने ढोलक वाद्यावर मोबाईल अडकवून ठेवला आहे आणि पैसे घेण्यासाठी क्यूआर कोडचा उपयोग करताना दिसून आला आहे.
आजकाल लग्नसमारंभात डीजेवर नाचण्याची फॅशन आहे. पण, तरीसुद्धा बँजो आणि ढोलक यावर ठेका धरणाऱ्यांची संख्या आजवर कमी झालेली नाही. जे लोक अनेकदा गर्दीसमोर नाचण्यास लाजतात, तेदेखील ढोलक वाद्याच्या तालावर नाचण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. जेव्हा एखादी व्यक्ती ढोलकी किंवा ढोलक वाद्य वाजवत असते, तेव्हा वाद्याच्या तालावर नाचणारे अनेकजण ढोलक वाजवणाऱ्याच्या डोक्यावरून पैसे फिरवून त्यांच्या हातात देतात. तर हीच गोष्ट लक्षात ठेवून एका ढोलक वाजवणाऱ्याने जुगाड केला आहे. एका लग्नसमारंभात एक व्यक्ती ढोलक घेऊन उभा आहे आणि या व्यक्तीने आपल्या ढोलकीवर लावण्यात आलेल्या दोरीमध्ये मोबाईल अडकवून ठेवला आहे आणि स्क्रीनवर क्यूआर कोड उघडून ठेवला आहे . जेणेकरून ज्यांना आनंदाने पैसे द्यायचे असतील ते क्यूआर कोडचा उपयोग करून पैसे पाठवू शकतील.
हेही वाचा… शंभर पंख्यांचा वापर करून साकारला गणपती बाप्पा, होर्डिंगवरील जाहिरातीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
पोस्ट नक्की बघा :
ढोलक वाजवणारा युपीआयने घेतोय पैसे :
सध्या सगळीकडे मोबाईलद्वारे ऑनलाइन व्यवहार करणे अनेक तरुणांची पहिली पसंती ठरली आहे. पैसे पाठवण्यासाठी अनेकजण क्यूआर कोडचा (QR Code) उपयोग करतात. हे पाहून अनेक व्यापारीसुद्धा क्यूआर कोडचा स्कॅनर ग्राहकांसाठी हमखास ठेवतात; तर आज ढोलक वाजवणाऱ्यानेसुद्धा हीच युक्ती वापरून त्याच्या ढोलकीवर क्यूअर कोड स्कॅनर लावून ठेवला आहे, जेणेकरून ढोलकीच सादरीकरण ज्यांना आवडेल ती प्रत्येक व्यक्ती स्कॅन करून त्याला पैसे पाठवू शकेल.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ एक्स (ट्विटर) @_prateekbh या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘ढोलक वाजवणारे यूपीआय घेत आहेत @बंगळुरू क्षण’ असे या फोटोला कॅप्शन देण्यात आले आहे. लग्न समारंभातील हा फोटो बंगळुरूचा आहे असे सांगण्यात येत आहे. तसेच लग्नसमारंभात गेलेल्या व्यक्तीने या खास गोष्टीचा फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे