Police Officer Viral Video : पोलिस म्हणजे शिस्त, जबाबदारी आणि कायद्याचा आधारस्तंभ. सामान्य माणसाला सुरक्षित वाटावं, रस्त्यावर कुठेही अन्याय झाला तर धावून यावं अशी अपेक्षा आपण पोलिसांकडून ठेवतो. पण, जेव्हा हाच रक्षक मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी पडलेला दिसतो तेव्हा प्रश्न फक्त त्या एका माणसाचा राहत नाही, तर संपूर्ण यंत्रणेबद्दलच शंका निर्माण होते. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ हेच वास्तव दाखवत आहे, ज्यामुळे लोकांमध्ये संताप व्यक्त होत असून जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
हा व्हिडीओ एका रोडसाइड कॅफेमधील असून, त्यामध्ये एक पोलिस कर्मचारी मद्याच्या नशेत बेशुद्ध अवस्थेत बसलेला दिसतो. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार एका परदेशी महिलेने आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला पोलिस कर्मचारी कॅफेमध्ये खुर्चीवर बसलेला दिसतो. त्याच्यासमोर टेबल आहे, आजूबाजूला लोक ये-जा करत आहेत, पण त्याची अवस्था पाहून सहज लक्षात येतं की तो शुद्धीवर नाही. डोळे बंद, शरीर सैल पडलं आहे, मान खाली झुकलेली आहे. पूर्णपणे दारूच्या नशेत आहे असं वाटत.
काही क्षणातच त्याचा तोल जातो आणि तो खुर्चीसकट जोरात खाली पडतो. पडल्यावरही त्याला काहीच कळत नाही. उठायचा प्रयत्नही तो करत नाही, हालचाल नाही. आजूबाजूचे लोक फक्त बघत राहतात. काही हसतात, काही आश्चर्याने मान हलवतात. याचदरम्यान एक विदेशी महिला तिथे येते. ती हे दृश्य पाहून थक्क होते आणि व्हिडीओ शूट करत विचारते – “हा खरंच पोलिस आहे का?” हा साधा प्रश्नच खूप काही सांगून जातो.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर justketh_irl या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, अवघ्या काही वेळात लाखो लोकांनी तो पाहिला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूूर येऊ लागला. अनेकांनी पोलिसांच्या वागणुकीवर टीका केली आहे. एका युजरने लिहिलं, “हेच का कायद्याचे रक्षक?” दुसऱ्याने टोमणा मारत म्हटलं, “देशाचं नाव रोशन केलंत!”
काहींनी थेट कारवाईची मागणी केली असून, “अशा पोलिसांना सस्पेंड केलं पाहिजे” असं मत व्यक्त केलं आहे; तर काही युजर्सनी दारूवरच निशाणा साधत, “या जगातली सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे दारू” अशी प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडीओ केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नाही, तो पोलिसांच्या शिस्तीवर, जबाबदारीवर आणि सार्वजनिक विश्वासावर मोठे प्रश्नचिन्ह उभं करतो.
