छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यातील एका प्राथमिक शाळेत धक्कादायक घटना घडली आहे. ज्यांच्यावर विद्यार्थ्यांना सुजाण नागरिक बनविण्याच्या जबाबदारी असते त्याच शिक्षकांनी लाज वेशीवर टांगण्याचा प्रकार केला आहे. शासकीय शाळेतील एका शिक्षकाने मद्यधुंद अवस्थेत लहान मुलींना नृत्य करायला लावून त्यांच्याबरोबर नृत्य केले. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता संबंधित शिक्षकावर कारवाई करण्यात आली आहे.
बलरामपूरच्या वद्रफनगर ब्लॉकमधील पशुपतीपूर प्राथमिक शाळेत सदर घटना घडली आहे. मुख्याध्यापक लक्ष्मी नारायण सिंह यांनी त्यांच्या मोबाइल फोनवर गाणी लावली आणि वर्गातील मुलींना नृत्य करायला लावले. त्यानंतर ते मुलींच्या मागे स्वतःही नाचत होते. शाळेतील एका कर्मचाऱ्याने हा प्रकार मोबाइलमध्ये चित्रीत करून याला वाचा फोडली.
विद्यार्थ्यांनी सांगितले की, लक्ष्मी नारायण सिंह अनेकदा शाळेत मद्यधुंद अवस्थेत येतो आणि विनाकारण शारीरिक शिक्षा देतो. अनेक विद्यार्थ्यांनी सिंहकडून वारंवार होणारे गैरवर्तन आणि मारहाणीबद्दल तक्रारी दिल्या होत्या.
सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर बलरामपूर जिल्हा शिक्षण अधिकारी डीएन मिश्रा यांनी लक्ष्मी नारायण सिंहला निलंबित केले. शिक्षणाधिकाऱ्यांनी वद्रफनगर गट शिक्षण अधिकारी मनीष कुमार यांच्याकडून अहवाल मागितला. अहवालातील निष्कर्षाच्या आधारे त्यांनी निलंबनाचा निर्णय घेतला.
स्थानिक आमदार शकुंतला पोर्ते यांनी शिक्षकाच्या या गैरवर्तनावर आक्षेप घेतला. शिक्षण विभागाने अशा शिक्षकांवर कठोर कारवाई कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. या घटनेमुळे शाळांमधील शिक्षकांचे वर्तन आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षा दिली जावी आणि शाळेतील वातावरण चांगले असावे, यासाठी शिक्षण विभागाने अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.