Dubai Reality Shocking Video : दुबईचे नाव घेताच डोळ्यांसमोर उभ्या राहतात त्या टोलेजंग चकचकीत इमातरी, अलिशान गाड्या आणि सोन्यासारखी चमकती लक्झरी लाइफस्टाईल, अनेकदा हा झगमगाट पाहून वाटते की, दुबईत राहणाऱ्यांची लाइफस्टाईल किती क्लासी, सोपी आणि सुखकर आहे. परंतु, या चकाकणाऱ्या दुबईतील एक अत्यंत कडू आणि भयावह सत्य समोर आले आहे. सध्या सोशल मीडियावर दुबईतील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
व्हिडीओने दुबईतील ग्लॅमरस जगामागील एक भयानक अनुभव सांगितला आहे. दुबईत वास्तव्यास असलेल्या ललित जोशी या भारतीय तरुणाने तिथल्या भीषण उष्णता आणि कामगारांच्या रोजच्या संघर्षाचे असे दाहक वास्तव समोर आणले आहे, जे पाहून तुम्हीही शॉक व्हाल.
रात्री ९ वाजता अंगातून वाहतायत घामाच्या धारा
व्हायरल व्हिडीओमध्ये ललित जोशीने दाखवले की, ड्युटी संपवून जेव्हा तो अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या स्वतःच्या रूमपर्यंत पायी चालत जात होता. तितक्यातच असह्य उकाड्यामुळे त्याचे कपडे घामाने पूर्णपणे भिजून चिंब झाले. अत्यंत चक्रावून टाकणारी बाब म्हणजे हा प्रकार भरदुपारी नाही, तर रात्री ९ वाजता घडला आहे. व्हिडीओच्या माध्यमातून ललितने एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उपस्थित केला आहे. जर रात्रीच्या वेळी एवढी जीवघेणी उष्णता आणि दमट हवामान (ह्युमिडिटी) असेल, तर भरदुपारी तळपत्या उन्हात काम करणाऱ्या लाखो कन्स्ट्रक्शन कामगारांची काय अवस्था होत असेल?
चकाकणाऱ्या इमारतींमागे कष्टकऱ्यांचे रक्त आणि घाम
इन्स्टाग्रामवर @lj290497 या अकाऊंटवरून शेअर केलेल्या या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ललितने स्पष्ट लिहिले आहे की, सोशल मीडियावर फक्त दुबईची लक्झरी आणि श्रीमंती दाखवली जाते. खरेच दुबई समजून घ्यायची असेल, तर आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी कडक उन्हात आणि असह्य उष्णतेत दिवस-रात्र घाम गाळणाऱ्या हजारो कन्स्ट्रक्शन वर्कर्सना विचारा. दुबईतील टोलेजंग इमारती आणि भव्यता ही केवळ पैशांवर नाही, तर या मेहनती कामगारांच्या रक्त आणि घामावर उभी आहे.
सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दुबईमध्ये राहणाऱ्या इतर अनेक भारतीय आणि परदेशी नागरिकांनी, तसेच शिपिंग क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ललितच्या दाव्याचे समर्थन केले आहे. दुबईतील उष्णता खरोखरच सहनशक्तीच्या पलीकडची असून, अशा अत्यंत प्रतिकूल हवामानात काम करणे अत्यंत आव्हानात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
