Robotic Food Delivery Dubai Viral Video: कल्पना करा, तुम्ही भूक लागली म्हणून ऑनलाइन जेवण ऑर्डर केले आहे आणि काही वेळात तुमच्या दाराबाहेर डिलिव्हरी बॉयऐवजी एक हाय-टेक रोबोट उभा आहे! ‘भाऊ पत्ता सांगा’ किंवा ‘मी खाली उभा आहे’ असे सांगणारे फोन कॉल नाही की मानवी हस्तक्षेप नाही. हे एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटातील दृश्य वाटत असले तरी, दुबईमध्ये हे प्रत्यक्षात घडत आहे.

एका भारतीय तरुणाने दुबईतील या अनोख्या ‘रोबोटिक फूड डिलिव्हरी’चा (Robotic Food Delivery) आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला असून, हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे.

नेमकी प्रक्रिया काय आहे?

हरीश कुमार (@thyharish) या भारतीय तरुणाने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये त्याने संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजावून सांगितली:

  • ऑटोमॅटिक ट्रॅकिंग: तुम्ही जेवण ऑर्डर केल्यानंतर, एक छोटा रोबोट जीपीएसच्या मदतीने स्वतःचा मार्ग शोधत तुमच्या लोकेशनपर्यंत पोहोचतो.
  • मोबाईल नोटिफिकेशन: रोबोट तुमच्या दारात किंवा ठरलेल्या ठिकाणी पोहोचताच तुमच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन येते.
  • झाकण उघडण्याची सुविधा: ॲपमध्ये ‘Open Lid’ (झाकण उघडा) हा पर्याय येतो. त्यावर क्लिक करताच रोबोटचे वरचे कव्हर आपोआप उघडते.
  • ऑर्डर कन्फर्मेशन: आपले जेवण बाहेर काढल्यानंतर ‘Order Collected’ या पर्यायावर क्लिक करावे लागते. त्यानंतर रोबोटचे झाकण बंद होते आणि तो रोबोट पुन्हा आपल्या तळावर निघून जातो.

कॉल-मुक्त आणि वेगवान सेवा

या तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणत्याही मानवी हस्तक्षेपाची गरज पडत नाही. ट्रॅफिकमध्ये अडकलेले डिलिव्हरी पार्टनर्स किंवा पत्ता शोधण्यात होणारा विलंब यावर हा एक उत्तम पर्याय मानला जात आहे. संपूर्ण प्रक्रिया केवळ काही क्लिक्सवर आधारित आहे.

सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत.

भविष्याची झलक: अनेकांनी याला ‘फ्युचरिस्टिक’ मानले असून, तंत्रज्ञानामुळे आयुष्य किती सोपे झाले आहे याचे कौतुक केले आहे.

सुरक्षेचा प्रश्न: काही वापरकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे की, जर रस्त्यावरून जाताना कुणी या रोबोटची छेडछाड केली किंवा त्यातील अन्न चोरले तर काय होईल? तसेच, यामुळे माणसांच्या नोकऱ्या धोक्यात येतील का, असाही प्रश्न विचारला जात आहे.