आयुष्यात प्रत्येकाची इच्छा असते की, समाजात आपली प्रतिष्ठा वाढावी आणि प्रत्येक व्यक्तीने आपला आदर करावा. मात्र, आचार्य चाणक्य यांच्या मते, मान-सन्मान फुकट मिळत नाही, तर तो आपल्या सवयी आणि वागणुकीतून कमावावा लागतो. यासाठी कोणतीही मोठी संपत्ती किंवा ताकदीची गरज नसते, तर काही साध्या जीवनमूल्यांचा अंगिकार करणे पुरेसे ठरते. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या त्या ५ महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या, ज्या तुम्हाला समाजात नवी ओळख मिळवून देऊ शकतात? जाणून घेऊया सविस्तर.
१. वचनबद्धता आणि विश्वासू स्वभाव ( Commitment and Trustworthiness)
आचार्य चाणक्य यांच्या मते, कोणालाही वचन देणे सोपे असते, पण ते वेळेत पाळणे म्हणजेच खरी कसोटी असते. जर कोणी तुमच्यावर विश्वास ठेवून आपल्या आयुष्यातील खास गोष्टी सांगितल्या, तर त्या गोष्टी आपल्यापर्यंतच मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. तुमचे शब्द आणि दिलेले वचन पाळण्याची सवय तुम्हाला एक विश्वासू व्यक्ती म्हणून उभी करते, ज्यामुळे समाजात तुमचा आदर वाढतो.
२.उत्तम संवाद आणि आदरयुक्त ऐकण्याची कला ( Effective Communication and Art of Listening)
चाणक्य सांगतात की, चांगला संवाद म्हणजे केवळ बोलणे नव्हे, तर समोरच्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे होय. बऱ्याचदा लोकांमध्ये केवळ स्वतःचे बोलण्याची सवय असते, समोरच्याला बोलण्याची संधी दिली जात नाही. जेव्हा तुम्ही इतरांच्या मतांचा आणि विचारांचा आदर करता, तेव्हा तेदेखील तुमच्या मतांना महत्त्व देतात. हा परस्पर आदर तुम्हाला समाजात नवी ओळख मिळवून देतो.
३.विनम्रता आणि संयम ( Humility and Patience)
प्रत्येक व्यक्तीशी, मग तिचे सामाजिक स्थान कोणतेही असो, नेहमी विनम्रतेने वागावे. ‘धन्यवाद’ म्हणणे, गरजवंतांना मदत करणे यांसारख्या साध्या कृती तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे ठरवतात. तसेच, कठीण प्रसंगात स्वतःला शांत ठेवणे ही तुमची परिपक्वता (मॅच्युरिटी) आणि नेतृत्व क्षमता दर्शवते.
४. सातत्यपूर्ण शिकणे आणि आदरभाव( Continuous Learning and Mutual Respect)
चाणक्य नीतिनुसार, लोक नेहमी अशा व्यक्तींचा आदर करतात जे आयुष्यात सतत काही ना काही शिकत असतात आणि स्वतःमध्ये सुधारणा करत असतात. प्रामाणिकपणे केलेले काम आणि संयमी जीवनशैली यामुळे मान-सन्मान स्वतःहून तुमच्याकडे चालत येतो. इतरांच्या परंपरा आणि कार्यांचा सन्मान केल्यासच तुम्हालाही मान मिळतो.
५. उत्तम संगती आणि मधुर वाणी ( Good Company and Sweet Speech)
शेवटी आचार्य चाणक्य सांगतात की, समाजात चांगली ओळख निर्माण करण्यासाठी नेहमी उत्तम संगतीची निवड करा, कारण संगत आपल्या विचारांवर आणि निर्णयांवर मोठा प्रभाव पाडते. याशिवाय, आपल्या वाणीत गोडवा असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण गोड बोलणे माणसाला सन्मान मिळवून देते, तर कठोर वाणी पतनाला कारणीभूत ठरते. त्यामुळे नेहमी चांगल्या लोकांच्या सहवासात राहा आणि वाणीवर नियंत्रण ठेवा.
