Elephant Attack During Valiyavilakku Festival : हत्ती हा बुद्धिमान प्राण्यांपैकी एक मानला जातो. पण तो भावनिक आणि सवेंदनशील देखील असल्याचे मानले जाते. हत्ती आपल्या कळपातील सदस्यांशी घट्ट नातं निर्माण करतो, धोका जाणवल्यास तत्काळ प्रतिक्रिया देतो आणि ताणतणावाच्या परिस्थितीत आक्रमकही होऊ शकतो. त्यामुळे तो केवळ शक्तिशाली नव्हे, तर संवेदनशील आणि परिस्थितीला प्रतिसाद देणारा प्राणी आहे. सोशल मीडियावर हत्तीचे कित्येक व्हिडीओ व्हायरल होत असतात ज्यामध्ये तो कधी हसण्यास भाग पाडतो तर कधी त्याचा संताप पाहून अंगावर काटा उभा राहतो.
केरळमधील मंदिर उत्सवात घडलेल्या अलीकडील घटनेनंतर हत्ती या प्राण्याविषयी नव्याने चर्चा सुरू झाली आहे. वार्षिक वलियाविलक्कू सोहळ्यादरम्यान सजावटीसाठी उभ्या असलेल्या हत्तीने अचानक संताप व्यक्त करत २६ वर्षीय तरुणाला सोंडेने उचलून हवेत भिरकावले. या घटनेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून मोठी खळबळ उडाली आहे.
ही घटना केरळमधील अन्नमानंद महादेव मंदिर येथे घडली. उत्सवासाठी मोठी गर्दी जमली होती. मिरवणुकीची तयारी सुरू असताना हत्ती शांतपणे उभा असल्याचे व्हिडीओत दिसते. एका व्यक्तीने हत्तीच्या पाठीवर चढण्याचा प्रयत्न केला, तर दुसरा ‘थिडंबू’ — देवतेची अलंकारिक प्रतिकृती — हातात घेऊन जवळ उभा होता. अचानक हत्तीने तरुणाच्या पायांना सोंडेने पकडले, काही अंतर ओढले आणि नंतर जोरात फेकून दिले. परिसरात एकच गोंधळ उडाला.
जखमी तरुणाला अंगमाली येथील Apollo Adlux Hospital येथे दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. घटनेनंतर उत्सव काही काळ स्थगित करण्यात आला. पोलिसांनी गर्दी नियंत्रणात आणली, तर विशेष हत्ती पथकाने प्राण्याच्या वर्तनाचे परीक्षण सुरू केले आहे.
अधिकाऱ्यांकडून हत्तीच्या अचानक संतापामागील कारणांचा तपास सुरू असून मंदिर उत्सवांदरम्यान हत्तींच्या सुरक्षेबाबतचे नियम अधिक कडक करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, व्हायरल व्हिडीओनंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी उत्सवांमध्ये मानव आणि प्राणी दोघांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची मागणी केली. तर काहींनी साखळदंडात बांधून धार्मिक विधींमध्ये हत्तींचा वापर करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “वन्य प्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच सुरक्षित असतात,” अशीही भावना अनेकांनी व्यक्त केली.
व्हायरल व्हिडीओमुळे उत्सव, श्रद्धा आणि परंपरा यांच्यात सुरक्षेचा समतोल कसा साधायचा, हा प्रश्न या घटनेनंतर पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
